CCTV: निर्दयी मुलाने कानशिलात मारली; वृद्ध आईने जागेवरच प्राण सोडले
नवी दिल्ली : 
दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली. द्वारका परिसरात पार्किंगवरून झालेल्या वादात रागाच्या भरात मुलाने आपल्या वृद्ध आईच्या कानशिलात लगावली. त्यामुळे वृद्ध आईचा जागेवरच मृत्यू झाला. द्वारकाचे डीसीपी संतोष कुमार मीणा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात ही घटना उघड झाली. या घटनेवरून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ मार्च रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास बिंदापूर पोलीस ठाण्यात एक फोन आला. मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. कॉल करणारी महिला शुधरा यांनी सांगितले की, इमारतीच्या मालकासोबत कार पार्क करण्यावरून वाद झाला होता. मात्र, हे प्रकरण आता मिटवण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील कारवाई करू नका असे तिने सांगितले. त्यावर पोलीस पथक माघारी फिरले.

या घटनेनंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पार्किंगवरून एक वृद्ध महिला अवतार कौर (वय ७६) तिचा मुलगा रणबीर आणि सून यांच्यात बाचाबाची झाली. त्याचवेळी रणबीरने त्याची आई अवतार कौर यांच्या तोंडावर जोराने थप्पड मारली. ती जमिनीवर कोसळली. ती जमिनीवर कोसळल्यानंतर तिच्या सूनेने तिला उठवण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या. ही घटना निषेधार्ह, संतापजनक आणि लज्जास्पद असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या. तर काहींनी या मुलाला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर वृद्ध महिलेला मुलाने आणि सूनेने रुग्णालयात नेले. मात्र, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांकडे या घटनेची कोणतीही तक्रार आलेली नाही. मात्र, पोलिसांनी स्वतःहून दखल घेतली असून, तपास सुरू केला आहे.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area