नागपूर : अडीच हजार कोटींचे खोटे व्यवहार उघड

 सध्या संपूर्ण देशभर बनावट देयकांद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मिळविणाऱ्यांवर छापामार कारवाई सुरू आहे.
सध्या संपूर्ण देशभर बनावट देयकांद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मिळविणाऱ्यांवर छापामार कारवाई सुरू आहे. त्याअंतर्गत जीएसटी महासंचालनालयातील गुप्तचर विभागाच्या (डीजीजीआय) नागपूर झोनल युनिटने दिल्ली-एनसीआर, नवी दिल्ली आणि फरिदाबादेतील अकरा बनावट कंपन्यांचा पर्दाफाश केला आहे. या कंपन्यांनी २,५३६ कोटींचे खोटे आर्थिक व्यवहार दाखवून ४६१.३४ रुपयांचा आयटीसी मिळविला आहे.


अकरापैकी दहा कंपन्या दिल्ली-एनसीआर येथील आहेत. या कंपन्यांनी नाशिक आणि धुळ्यातील कंपनीला पुरवठा केल्याचे दाखवून आर्थिक गैरव्यवहार केला. त्याद्वारे सुमारे ३१५.६५ कोटींचा आयटीसी मिळविण्यात आला. तर एका कंपनीने १४५.६९ रुपयांचा आयटीसी कमविला. या कंपनीनेही नाशिकमधील काही प्रतिष्ठानांशी आर्थिक व्यवहार केल्याचे दाखविले. प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारचा पुरवठा कंपन्यांद्वारे करण्यात आला नाही. नागपूर झोनल युनिटचा विचार करता आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. दोन वेगवेगळ्या नेटवर्कच्या माध्यमातून या अकराही कंपन्या आर्थिक घोटाळा करत असल्याचे दिसून आले.

एकाच पॅनकार्डचा उपयोग 

आयटीसी मिळविण्यासाठी चार कंपन्यांनी एकाच पॅनकार्डचा उपयोग केला. एकाच कार्डचा तपशील त्यांनी जाहीर केला होता. या चारही कंपन्या नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील कंपन्यांसोबत आर्थिक व्यवहार करायच्या. कंपन्यांनी जागेचा पुरावा म्हणून दिलेल्या पत्त्याचा शोध लावला असता तिथे धार्मिळस्थळ तसेच अन्य व्यक्तींचे निवासस्थान आढळून आले. यावरून खोटे कागदपत्र देत नोंदणी केल्याचे सिद्ध झाले आहे.

कारवाई दृष्टिक्षेपात कंपन्यांची संख्या : ११ शहरांची नावे : नवीदिल्ली, दिल्ली-एनसीआर, फरिदाबाद एकूण खोटा व्यवहार : २,५३६ कोटी एकूण आयटीसी : ४६१.३४ कोटी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area