आक्रमक शेतक-यांनी कर्मचा-यांना कार्यालयात काेंडले; शेतात ऊसतोडणी यंत्रणा पोचल्यावरच टाळे उघडले

 रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : सध्या ऊसतोडणीबाबत हस्तक्षेप होत असल्याने तोडणी प्रक्रियेत दिरंगाई होत आहे. त्यामुळे शेतात ऊस उभे असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तोडणी प्रक्रियेतील दिरंगाईमुळे कोडोली येथील शेतकऱ्यांनी नुकतेच यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वडगाव हवेली येथील गट ऑफिसला टाळे ठोकून कर्मचाऱ्यांना कोंडले. तेथील संबंधित कर्मचाऱ्यांनी तोडणी यंत्रणा शेतात पोचवल्यानंतर टाळे काढण्यात आले. या घटनेची परिसरात खूपच चर्चा झाली. 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोडोलीतील शेतकरी अक्षय ऊर्फ बापूराव जोतिराम पाटील यांच्या एक एकर क्षेत्रातील पूर्वहंगामी ऊस तोडणीस संबंधित गट ऑफिसमधील कर्मचारी दाद देत नव्हते. श्री. पाटील यांनी गट अधिकाऱ्यांच्या पूर्व संमतीने ऊस पेटवून तो कारखान्यास देण्याची तयारी केली होती; परंतु गेली चार ते पाच दिवस ऊस तोडण्यास दिरंगाई होत असल्याने ते संतप्त होते. तोच तेथील भीमराव परशुराम पाटील यांच्या क्षेत्रातील तुटलेला ऊस गेली आठ दिवस शेतात पडून आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या भीमराव पाटील यांच्या पत्नी शारदा पाटील यांनी कार्यालयाबाहेर येऊन गोंधळ केला. त्यानंतर श्री. पाटील यांनी शारदा पाटील, सुदर्शन पाटील, चंद्रकांत पाटील व प्रदीप पाटील यांच्याबरोबर जाऊन गट कार्यालयास टाळा लावला. 

त्या कार्यालयात गट अधिकारी व कर्मचारी यांना कोंडून त्यांना वस्तुस्थिती सांगितली. तत्काळ शेतात यंत्रणा पाठवण्याबाबत फर्मावले. संबंधित कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांशी संवाद साधून श्री. पाटील यांच्या शेतात यंत्रणा पोच केली. त्यानंतर टाळे काढले. दरम्यान सौ. पाटील यांच्या ऊस वाहतुकीबाबत कारखाना प्रशासनाने रात्री उशिरापर्यंत कोणतेही ठोस पाऊल उचलले नव्हते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area