कंगना रणौटविरोधात आणखी एक गुन्हा

 


मुंबई: वादग्रस्त ट्विट तसेच मुंबईत दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौट पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. 'डीड्डा : द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीर' या पुस्तकाचे लेखक आशीष कौल यांनी परवानगीशिवाय कथेचा वापर केल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली आहे. आधीच दोन गुन्हे त्यात हृतिक रोशन ई-मेल वाद ही प्रकरणे सुरू असतानाच कंगनाला आणखी एक प्रकरणाला सामोरे जावे लागणार आहे.

कौल यांनी त्यांच्या 'डीड्डा : द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीर' या पुस्तकातील कथेचा आशय असलेला ई-मेल कंगनाला काही दिवसांपूर्वी पाठवला होता. याबाबत कोणतीही चर्चा अथवा परवानगी न घेता लगेच दुसऱ्याच दिवशी कंगना हिने ट्विट करून चित्रपटाची घोषणा केली. या ट्विटमध्ये तिने कथेतील काही भाग वापरल्याचा आरोप करत कौल यांनी वांद्रे येथील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात तक्रार केली. न्यायालयाने अन्यायाने विश्वासघात, फसवणूक व कॉपीराइटचे उल्लंघन केल्याचे कलमांखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. या आदेशानुसार खार पोलिसांनी कंगना हिच्यासह कमलकुमार जैन, रंगोली चांडेल, अक्षत रणौट यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४०६, ४१५, ४१८, ३४, १२०(ब) सह ५१, ६३, ६३अ कॉपीराइट अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला.

वांद्रे पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये कंगना आणि तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात १२४-अ (देशद्रोह) या कलमाबरोबरच १५३-अ (धार्मिक व जातीय सलोखा बिघडवणे) व २९५-अ (धार्मिक भावनांना ठेच पोचवणे) या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी कंगनावर मानहानीचा दावा केला आहे. हृतिक रोशन सोबत असलेल्या ई-मेल वाद प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्यात आला आहे. त्यातच आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने कंगनाच्या अडचणीत भर पडली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area