अमरावती : ऑनलाइन वस्तू खरेदी केल्यानंतर गुगलवरून कस्टमरकेअरचा क्रमांक शोधून बॅंकिंगची माहिती अनोळखी व्यक्तीला शेअर करणे अनेकांना महागात पडत आहे. परतवाडा येथील एका व्यक्तीला तोतयाने 77 हजार 798 रुपयांनी चुना लावला. मनीष ज्ञानेश्वर होले (वय 35, रा. गुरुकुल कॉलनी, परतवाडा), असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. श्री. होले यांनी शॉप 101 वरून ऑनलाइन साडी 487 रुपयांमध्ये खरेदी केली. पैसेही ऑनलाइन पाठविले. परंतु चोवीस तास उलटूनही त्यांना ऑर्डर दिल्याचे दिसून आले नाही. श्री. होले यांनी कोठूनतरी कस्टमर केअरचा क्रमांक शोधून त्यावर संपर्क साधला.
अशाप्रकारे अनोळखी व्यक्तींसोबत संपर्क साधणेच त्यांच्या अंगलट आले. ज्या क्रमांकावर संपर्क साधला, त्या व्यक्तीने श्री. होले यांना टेक्निकल इश्यू, असे उत्तर दिले. परंतु ऑर्डर रद्द करून पैसे परत पाठविल्या जाईल, असे उत्तर अनोळखी व्यक्तीकडून मिळाले. मात्र त्यासाठी त्या व्यक्तीने श्री. होले यांना एनी डेस्क हे ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले.
सदर ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्याद्वारे तोतयाने श्री. होले यांच्याकडून बॅंक डिटेल्ससुद्धा मागवून घेतले. बॅंकखात्याशी संबंधित तांत्रिक माहिती शेअर करताच, त्यांच्या खात्यामधून 77 हजार 798 रुपये एवढी रक्कम तोतयाने आपल्या खात्यात ऑनलाइन वळती करून श्री. होले यांची फसवणूक केली. सदर व्यक्तीच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.