पुणे, ता. 16 : हडपसरमधील शिंदे वस्ती परिसरातील कालव्यात सोमवारी मृतावस्थेत सापडलेल्या व्यक्तीचा खुन झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तीक्ष्ण हत्याराने वार करून संबंधीत व्यक्तीचा खुन झाला असून अनोळखी व्यक्तीविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल श्रीकृष्ण नेने (वय 45, रा. 827, सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ सिद्धार्थ नेने (वय 39) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेने यांना दारुचे व्यसन होते. त्यांच्या व्यसनाधिनतेमुळेच पाच वर्षांपूर्वी त्यांची पत्नी आणि दोन मुले त्यांच्यापासून विभक्त झाली होती. दरम्यान, नेने हे वाहन दुरुस्तीचे कामे करून उदरनिर्वाह करीत होते. मात्र, व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे ते घरी राहात नव्हते. त्यांना काही दिवसांपुर्वी नऱ्हे येथील एका व्यसनमुक्ती केंद्रात ठेवले होते. तर 11 मार्च रोजी ते संबंधीत व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडले होते. तेव्हापासून ते बेपत्ता होते.
दरम्यान, सोमवारी दुपारी हडपसरमधील शिंदे वस्ती भागातील कालव्यात मृतदेह सापडला. मृत व्यक्तीच्या अंगावर मारहाणीच्या खुना होत्या. सुरूवातीला मृत व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती. तपास सुरू असतानाच संबंधीत मृतदेह राहूल नेने या व्यक्तीचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.नेने यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास हडपसर पोलिसांकडील दोन पथके करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.