इचलकरंजी, दि.११ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ऊसतोड महिलांच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय कोल्हापूर अंतर्गत कामगार कल्याण भवन इचलकरंजी यांच्यावतीने आणि जवाहर साखर कारखाना हुपरी यांच्या सहकार्याने कारखाना कार्यस्थळावर ऊसतोड महिला मजुरांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते.
कार्यक्रमाचे स्वागत जवाहर साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर यांनी तर प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी करतांना अत्यंत वंचित उपेक्षित असणारा ऊस तोड कामगार व त्यांच्या महिला ज्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल सोयी-सुविधापासून वंचित राहिलेल्या असतात. त्यांच्या आरोग्याची हेळसांड थांबवावी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणण्यासाठी कॅन्सर सारख्या आजाराबद्दल त्यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी कॅन्सरची तपासणी व जनरल तपासणी करत असल्याचे सांगितले.
याकामी कोल्हापूर कॅन्सर सेंटर कोल्हापूर यांच्यावतीने महिलांच्या कॅन्सर विषयी तपासणीकरिता मॅमोग्राफी तपासणी व्हॅन आपल्या तज्ञ डॉक्टर्स व स्टाफ सह डॉक्टर रेश्मा सुरज पवार यांनी उपलब्ध करून दिली. याचबरोबर डॉक्टर सुप्रिया माने व डॉक्टर तृप्ती कुंभार इचलकरंजी यांनी सर्व महिलांचे जनरल चेक-अप करून त्यांच्या समस्या जाणून घेत व्यक्तिगत व परिसर स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती किरण कांबळे यांनी, ऊसतोड मजुरांसाठी कारखान्याच्या वतीने सर्व त्या सोयी पुरवल्या जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमासाठी कारखान्याचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर उमेश माने,लेबर ऑफिसर अनिल वलशेट्टी,कामगार संघटनेचे बाळासो सूर्यवंशी , श्रीकांत करडे, अविनाश कांबळे ,वृषभ ऐतवडे प्रमुख उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे संयोजन केंद्र संचालक सचिन खराडे व सहाय्यक संचालिका शाहीन चौगुले यांनी केले तर कार्यक्रम पार पाडण्यासाठी केंद्र संचालक संघसेन जगतकर, चंद्रकांत घारगे, दीपक गावराखे, सचिन शिंगाडे ,संपदा देसाई, लक्ष्मी कांबळे, अमित चव्हाण आदींनी परिश्रम घेतले