पुणे - महिला अत्याचाराविरोधात घसा फुटेपर्यंत ओरडणारे सत्तेत आहेत. मात्र, ही मंडळी आता काहीच बोलत नाहीत. ते का, असा प्रश्न विचारत वाढत्या अत्याचारांना सरकारच विशेषतः: गृहखाते जबाबदार आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्र वाघ यांनी केली. महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारींपासून त्यावरील कार्यवाहीत पोलिस आखडता हात घेत असून, हे गृहमंत्र्यांचे अपयश असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. महिला अत्याचाराबाबतच्या पोलिस तपासाची माहिती जाणून घेण्यासाठी पुण्यात आलेल्या वाघ यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट दिली. तेव्हा संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी चर्चा केली. राज्यातील बलात्काराच्या घटना, तपासयंत्रणा, तिचा वेग, पोलिसांचा हस्तक्षेप, त्यातूनची दिरंगाई आणि अशा घटनांमागचे राजकारण यावर वाघ यांनी आपली भूमिका मांडली.
वाघ म्हणाल्या, ‘‘टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणाला संजय राठोडच जबाबदार आहेत, हे राज्याला ठाऊक झाले आहे. या प्रकरणात तथ्य असल्यानेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला. तसे नसते तर राजीनामा झाला नसता. पुण्यासह अन्य जिल्ह्यांतील महिलांवर अत्याचार होत आहेत; स्थानिक पोलिस गांभीर्याने लक्ष देत नाही. साधी तक्रारही घेतली नाहीत. त्यावर महाविकास आघाडीचे सरकार काहीच बोलत नाही. याआधी सतत अत्याचाराविरोधात बोलत होता; मात्र, आता सारे मंत्री गप्प का आहेत. सत्तेत आल्यानंतर काही मुद्यांवर बोलायचे नसते का? ’’
‘कोणाच्या धमक्यांना घाबरत नाही’
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मी अजूनही तेवढीच आक्रमक असून, राठोड यांच्याकडील मंत्रिपदाचा राजीनामा झाला म्हणून मी थांबणार नाही. या घटनेचा तपास न्याय मिळेपर्यंत गेला पाहिजे. या घटनेबाबत आक्रमक झाल्यानंतर धमक्यांपासून अनेक बाबीं सहन कराव्या लागल्या. त्याचा त्रासही झाला. पण माझ्या भूमिकेचे कौतुक झाले. परंतु, यापुढेही तेवढ्याच ताकदीने महिलांच्या प्रश्नांवर काम करेन. कोणाच्या धमक्या आणि अन्य उद्योगांना घाबरत नाही. मी कोणाच्या तालमीत तयारी झाली आहे, हे राज्याला माहीत आहे. त्यामुळे माझ्यावर भूमिकेवर ठाम आहे, असेही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.