सर्वसामान्याची मोटारसायकल चोरीस गेली तर त्याच्या अंगावर काटा उभा राहतो.
कोल्हापूर :
गर्दीच्या ठिकाणांबरोबर शासकीय, निमशासकीय कार्यालयात येणारी वाहने हेरून ती चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. शहर परिसरातील वाहनचोरीचे ब्लॅक स्पॉट वाढू लागलेत. त्यामुळे वाहनचालकांत धास्ती वाढू लागली आहे.
गजबजलेल्या रस्त्यावर अगर दारात उभे केलेले वाहन सुरक्षित राहील याची आज शाश्वती देता येत नाही. ठाण्यात दररोज एक-दोन वाहनचालक वाहन चोरीस गेल्याची तक्रार घेऊन येतात. यात दुचाकींचे प्रमाण मोठे आहे. चोरट्याने बनावट चावीने अगर लॉक तोडून हा प्रकार केल्याच्या नोंदी पोलिसांत होतात. बसस्थानक, रेल्वे स्टेशन, भाजी मार्केट अशा गर्दीच्या ठिकाणीच नव्हे, तर शासकीय, निमशासकीय कार्यालयात येणाऱ्या वाहनांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. काही महिन्यांत झालेल्या चोरीच्या नोंदीवरून हे प्रकार समोर येत आहेत.
सर्वसामान्याची मोटारसायकल चोरीस गेली तर त्याच्या अंगावर काटा उभा राहतो. यापूर्वी वाहनचोरीची तक्रार सहजासहजी नोंद होत नव्हती; मात्र पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्याची तक्रार नोंदवून घ्या, दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढली तरी चालेल; पण ही संख्या जर कमी झाली तर त्याची विचारणा केली जाईल, असे संकेत सर्व पोलिस ठाण्यांना दिले. त्यानुसार आता प्रत्येक तक्रारीची नोंद होऊ लागली. यातून शहर परिसरात वारंवार घडणारे वाहनचोरीचे वास्तव पुढे येत आहे.
वाहनचोरीचे ब्लॅक स्पॉट
* मध्यवर्ती बसस्थानक
* रेल्वे स्टेशन
* रंकाळा स्टॅंड, चौपाटी
* प्रशासकीय इमारती
* लक्ष्मीपुरी
* राजारामपुरी
* प्रतिभानगर, राजेंद्रनगर
सर्वसामान्यांच्या अपेक्षा
चोरीच्या ब्लॅक स्पॉटवर वॉच ठेवा
परिसरात सीसी टीव्ही बसवा
गस्त वाढवून चोरट्यांचा छडा लावा