पिंपरी-चिंचवड शहरात जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू होण्याची शक्यता

 पिंपरी शहरात गेले अकरा महिने करण्यात आलेल्या प्रयत्नांनंतर कोरोना आटोक्यात आला होता. मात्र १ फेब्रुवारीपासून बाजार व इतर ठिकाणी गर्दी वाढत असल्याने आता दिवसाला ७०० ते ८०० कोरोना रुग्ण आढळत आहेत

पिंपरी - शहरात गेले अकरा महिने करण्यात आलेल्या प्रयत्नांनंतर कोरोना आटोक्यात आला होता. मात्र १ फेब्रुवारीपासून बाजार व इतर ठिकाणी गर्दी वाढत असल्याने आता दिवसाला ७०० ते ८०० कोरोना रुग्ण आढळत आहेत. येत्या काही दिवसात रूग्ण वाढण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी नेहरूनगरमधील जम्बो रुग्णालय सज्ज आहे. हे रुग्णालय कधीही सुरू करण्याची तयारी वैद्यकीय विभागाने केली असल्याची माहिती अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.


शहरात गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. गेल्या अकरा महिन्यांत करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. कोरोनावर मात करण्याची तयारी सुरू असतानाच बार, हॉटेल, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये, खेळाची मैदाने आदी ठिकाणी गर्दी करण्यास सुरवात झाली आणि कोरोना वाढला. फेब्रुवारी महिन्यात रुग्णांची आकडेवारी वाढल्याने पुन्हा एकदा महापालिकेने निर्बंध लादले. सध्याची परिस्थिती पाहता कधीही ८१६ खाटांचे स्वतंत्र कोविड जम्बो रुग्णालय सुरू करण्यात येईल. सध्या ते बंद आहे. पण व्हेंटिलेटर आदी सुविधा आहेत. ज्या वापरल्या जात नाहीत त्या सुरू आहेत का, त्यांची तपासणी करून यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत चर्चा सुरू आहे. 


झोपडपट्टी आणि चाळी, अशा दाटीवाटीच्या विभागातील रुग्ण वाढू लागल्यास त्या रुग्णांना या जम्बोमध्ये भरती करता येणार आहे. रुग्णांना ते राहत असलेल्या विभागातील कोरोना सेंटरमध्ये किंवा रुग्णालयात भरती करता यावे, त्यांना खाटा मिळाव्यात याचे नियोजन विभागातील वॉर्ड वॉर रूमद्वारे करण्यात येणार आहे.


रुग्णालयामधील बेड तयार आहेत, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर तयार ठेवले आहेत. औषधांचा इंजेक्शनचा साठा पुरेसा आहे. येथे क्रिटिकल आणि लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी बेड सज्ज आहेत. हायरिस्क लोकांना तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवले जाते. यासाठी पुरेशे बेडची तयारी आहे. जम्बो रुग्णालयात ६१६ ऑक्सिजनयुक्त खाटा आहेत. २२० आयसीयू खाटा आहेत. याठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा कुठेही कमी पडणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area