करंजे येथीला बसाप्पा पेठ परिसरात एक महिला भाड्याने खोलीत राहण्यास असून तिची विवाहित मुलगी मंगळवार पेठेत राहण्यास आहे. ती मुलगी एका खासगी हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहे. नोकरीस जावे लागत असल्याने ती चार वर्षीय मुलीस बसाप्पा पेठेत राहणाऱ्या आईकडे सोडते. सोमवारी (ता. 8) चार वर्षीय बालिका ही बसाप्पा पेठेत राहणाऱ्या आजीकडे राहण्यासाठी आली. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ती अंगणात खेळत होती. यावेळी तिची आजी घरात काम करत होती. काम संपल्यानंतर अंगणात खेळणारी बालिका आजीला दिसली नाही. त्यामुळे त्यांनी शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. याबाबतची माहिती आजीने मुलगी, जावयास दिली. याचदरम्यान सायंकाळी एका रिक्षातून त्या बालिकेने मंगळवार पेठेतील एका दवाखान्यात आलेल्या आईला हाक मारली. आईला हाक मारल्याचे पाहून रिक्षात असणाऱ्यांनी तिला सोडत पळ काढला.
केस मागे घेण्याच्या कारणावरून गेल्या महिन्यात त्या बालिकेच्या कुटुंबीयांना तिघांनी दम दिला होता. दम देणाऱ्या अमित शिवाजी बाबर, रवींद्र कुंभार, महेश जाधव (रा. बाबर कॉलनी, करंजे) यांनीच त्या बालिकेचे अपहरण केल्याचा संशय शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीत अपहृत बालिकेच्या आजीने म्हटले आहे.