कास (जि. सातारा) : तेटली गावच्या हद्दीत दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात अचानक ब्रेक मारल्याने चारही टायर लॉक झाल्याने रस्त्यावरच बस बंद पडली. ही बस बंद पडल्याने साताऱ्याकडे येणारे प्रवासी मध्येच अडकले. त्याचबरोबर रस्त्यावरील वाहतूकही बंद झाली.
या बसचे चारही टायर जाम झाल्याने बस वळणावर मध्येच अडकली. त्यामुळे साताऱ्याकडे येणारी वाहने एसटीच्या पाठीमागे अडकली. तेटलीच्या पुढील गावांना जाणारी वाहनेही अडकून पडली. ही घटना शनिवार घडल्याने या भागात येणाऱ्या पर्यटकांचीना ही रस्ता बंद झाल्याने खूप त्रास झाला. अनेक पर्यटक हे तेटलीच्या अलीकडेच अडकले. साताऱ्याहून दुरुस्तीचे वाहन निघाले तरी तेटलीपर्यंत पाेचण्यासाठी त्यास दोन तासांचा अवधी लागणार होता. त्यानंतर दुरुस्तीसाठी लागणारा वेळ लक्षात घेता पूर्ण दिवसभरासाठी वाहतूक विस्कळित झाली होती.
बामणोली भागात देण्यात येणाऱ्या गाड्या नादुरुस्त असतात. कधी ब्रेक निकामी, तर कधी अचानक बंद यामुळे या भागातील वाहतूक रामभरोसेच असते. एसटी प्रशासनाने प्रवाशांच्या जीवाशी न खेळता चांगल्या गाड्याच दुर्गम भागात पाठवाव्यात अशी मागणी संतोष मालुसरे (सामाजिक कार्यकर्ते, फुरूस) यांनी केली आहे.