लॉकडाऊनमुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये महाविद्यालये सुरू होऊ शकली नाहीत तरीही जुलै- आॅगस्ट महिन्यापासून प्रथम वर्ष वगळता इतर सर्व वर्षातील वर्ग आॅनलाइन सुरू झाले आहेत.
लॉकडाऊनमुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये महाविद्यालये सुरू होऊ शकली नाहीत तरीही जुलै- आॅगस्ट महिन्यापासून प्रथम वर्ष वगळता इतर सर्व वर्षातील वर्ग आॅनलाइन सुरू झाले आहेत. एक सत्रात ९० दिवस शिक्षण देणे आवश्यक असते. त्यानुसार महाविद्यालयांनी त्यांना जमेल त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले. मात्र, आॅनलाइन शिक्षणात नेटवर्क, विद्यार्थ्यांकडे उपलब्ध साधणे, प्राध्यापकांवर आलेल्या मर्यादा यामुळे आॅनलाइन शिक्षणाचा दर्जा राखणे महाविद्यालयांपुढे आव्हान निर्माण झाले होते.
‘‘यूजीसीने कोरोनाची स्थिती कशी आहे त्यावरून विद्यापीठांना अभ्यासक्रम कमी करण्याचा अधिकार दिला आहे. त्यासाठी पुणे विद्यापीठ अधिष्ठातांकडून मते मागवली जात असून, दुसरे सत्र लवकर संपविण्यासाठी अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला जाईल.’’ डॉ. एन.एस. उमराणी, प्र-कुलगुरू , पुणे विद्यापीठ
‘‘सध्याच्या नियोजनानुसार १५ मे पर्यंत दुसरे सत्र संपायला हवे होते, पण कोरोनामुळे ती वेळेत संपणार नसल्याने त्याचा कालावधी थोडासा वाढवावा लागेल. तसेच कालावधी वाढवायचा नसेल तर अभ्यासक्रम काही प्रमाणात कमी करावा लागेल’’. डॉ. पी. बी. बुचडे, प्राचार्य, गरवारे महाविद्यालय
प्रथम सत्राचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला आहे. काही महाविद्यालयांनी द्वितीय सत्रांचे आॅनलाइन वर्ग घेण्यास सुरवात केली आहे. पुणे विद्यापीठाची प्रथम सत्र परीक्षा ११ एप्रिलला सुरू झाल्यानंतर मे अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर त्वरित द्वितीय सत्राच्या परीक्षांचे नियोजन विद्यापीठाकडून सुरू केले जाईल. कोरोनामुळे महाविद्यालये सुरूच होऊ शकलेले नाहीत, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेसह इतर अभ्यासक्रमाचे प्रॅक्टिकल अद्याप विद्यार्थ्यांना शिकवता आलेले नाहीत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष मे मध्ये संपण्याऐवजी जुलै- आॅगस्टममध्ये संपेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचा परिमाण पुढच्या वर्षाच्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षावर होणार आहे. जे विद्यार्थी अंतिम वर्षात आहेत, त्यांना पुढच्या शिक्षणामध्ये अडथळा येईल अशी भीती आहे. त्यामुळे दुसरे सत्र जास्त काळ लांबणीवर पडू नये अभ्यासक्रमात कपात करावी लागणार आहे.