या योजनेसाठी आतापर्यंत सुमारे 45 लाख लोकांनी नोंदणी ही केली आहे. एलआयसीच्या माध्यमातून ही योजना चालवली जात आहे.
नवी दिल्ली- PM Shram Yogi Mandhan Yojana: पुन्हा एकदा गरीब आणि ज्येष्ठ व्यक्तींना समोर ठेवून मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. मोदी सरकारने अशा व्यक्तींसाठी दर महिन्याला 3000 रुपये देण्याची घोषणा केली आहे. या योजनेसाठी आतापर्यंत सुमारे 45 लाख लोकांनी नोंदणी ही केली आहे. केंद्र सरकारने अशा व्यक्तींसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेची सुरुवात केली आहे. यामध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिकांना वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर दरमहा 3000 रुपये किमान पेन्शन दिली जाईल. सरकारने 2019 मध्ये प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PM-SYM) सुरु केली होती.
या योजनेअंतर्गत 4 मार्च 2021 पर्यंत सुमारे 44.90 लाख श्रमिकांनी आपली नोंदणी केली आहे. या योजनेत 18-40 वर्षांच्या समूहाचे असे श्रमिक सहभागी होऊ शकतात, ज्यांचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
किती मिळेल पेन्शन
PM-SYM योजनेअंतर्गत 55 रुपये ते 200 रुपये महिना गुंतवणूक केली जाऊ शकते. यामध्ये 18 वर्षाच्या व्यक्तींना महिना 55 रुपये आणि 30 वर्षांच्या व्यक्तीला 100 रुपये तर 40 वर्षीय व्यक्तीला 200 रुपये महिना भरावे लागतील.
जर एखाद्या श्रमिकाने 18 व्या वर्षी PM-SYM योजनेत आपली नोंदणी केली तर त्याला एका वर्षाला केवळ 660 रुपये जमा करावे लागतील. या श्रमिकाला 60 व्या वर्षापर्यंत 27,720 रुपये गुंतवावे लागतील. श्रमिकाला 42 वर्षांपर्यंत पैसे गुंतवावे लागतील. 60 वर्षे झाल्यानंतर त्याला दरमहा 3000 रुपये मिळतील. भारतीय जीवन विमा निगमच्या (LIC) माध्यमातून ही योजना चालवली जात आहे. त्यामुळे पेन्शनही एलआयसीकडून दिली जाईल.
अशी करा नोंदणी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत नाव नोंदवण्यासाठी श्रमिकांना आधार कार्ड, बँक खात्याचे पासबुक घेऊन कॉमन सर्व्हिस सेंटरला जाऊन खाते सुरु करावे लागेल. खाते सुरु केल्यानंतर श्रमिकांना श्रम योगी कार्ड जारी केले जाईल. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी 1800-267-6888 या हेल्पलाइनवर संपर्क साधता येईल.