२ लाखांची रोकड घेऊन दुचाकीवरून चालला होता, इतक्यात दोघांनी...

 रबाळे नाका येथून एमआयडीसी मार्गे महापे येथे दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटले. त्याच्याकडील २ लाखांची रोकड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

मुंबई: 
वसुलीची २ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन चाललेल्या एका तरुणाला मोटरसायकलवरुन आलेल्या दोघा लुटारुंनी चाकूचा धाक दाखवून ती रक्कम लुटून नेल्याची घटना महापे एमआयडीसी भागात नुकतीच घडली. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या घटनेतील दोघा लुटारुंवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

या घटनेतील तक्रारदार तरुणाचे नाव महेश गुप्ता (२२) असे असून तो तुर्भे येथे राहातो. महेशच्या कुटुंबीयांचा मनी ट्रान्स्फरचा तसेच रीटेलर ग्राहकांना कर्ज देण्याचा व्यावसाय आहे. या कर्जाची वसुली महेश करतो. गेल्या शुक्रवारी महेशने तीन-चार ठिकाणांहून सुमारे २ लाख रुपयांची रक्कम वसूल केली होती. त्यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तो आपल्या मित्रासह स्कुटीवरून रबाळे नाका येथून एमआयडीसी मार्गे महापे येथे वसुलीसाठी जात होता.

यावेळी त्यांची स्कुटी रिलायन्स कंपनीच्या एफ गेट समोर आली असता मागून मोटरसायकलवरून आलेल्या दोघा लुटारुंनी तुम्ही मुलींची छेड का काढली, असे बोलून त्यांना हटकले. महेशने स्कुटी थांबविल्यांनतर त्याला आणि त्याच्या मित्राला एका लुटारुने चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर त्याने २ लाख रुपयांची रोख रक्कम असलेली महेशची बॅग हिसकावून रबाळेच्या दिशेने पलायन केले. त्यानंतर महेशने रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area