एका चार्टर्ड अकाउंटंटची भरदिवसा त्याच्या घराबाहेरच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. नवी दिल्लीतील आदर्शनगरमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली:
दिल्लीतील आदर्शनगरमध्ये खळबळजनक घटना घडली. भरदिवसा एका चार्टर्ड अकाउंटंटची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी त्यांच्या घराबाहेरच ही घटना घडली.
दिल्लीतील गुन्हे आणि गुन्हेगारांना रोखल्याचा दावा पोलिसांकडून केला जात असला तरी, गुन्हेगार अजूनही मोकाट असल्याचे दिसते. दिल्लीच्या आदर्शनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच धक्कादायक घटना घडली. चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या व्यक्तीची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अनिल अग्रवाल असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल अग्रवाल यांच्यावर मंगळवारी सकाळी हल्ला झाला. ते आपल्या घराबाहेर होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले. अनिल जखमी अवस्थेत जमिनीवर पडले होते. काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तिथे पोहोचले. हल्लेखोर तोपर्यंत पसार झाले होते. अनिल अग्रवाल यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आणि विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.