कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे शहरात पुन्हा लॉकडाउन होणार असल्याची चर्चा गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू होती. मात्र, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात अधिकारी, पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन लॉकडाउनऐवजी काही प्रमाणात निर्बंध घातले.
अशा उपाययोजना व शहरातील रुग्णांची स्थिती, वैद्यकीय सुविधा यांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. १२) पुण्यात महापालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यामुळे शहरात पुन्हा लॉकडाउन होण्याची चर्चा सुरू होती. मात्र, लॉकडाउन न केल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. महापौर उषा ढोरे, महापालिका आयुक्त राजेश पाटील बैठकीला उपस्थित होते.
लॉकडाउन न केल्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. कारण, यापूर्वीच्या लॉकडाउनमध्ये खूप नुकसान झाले. त्याचे दुष्परिणाम आजही सोसतो आहोत. त्यावेळी कामगार परत गेले. त्यातील बहुतांश परत आलेच नाहीत. आता परिस्थिती सुधारत आहे, त्यामुळे पुन्हा लॉकडाउन परवडणारे नाही. आम्ही सर्व नियम पाळत आहोत. आवश्यक तितकेच लोक कामावर बोलावत आहोत. अन्य नागरिकांनीही नियमांचे काटेकोर पालन करायला हवे.
- जयंत कड, सचिव, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना
लॉकडाउन होण्याची वाट पाहण्यापेक्षा नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कारण, लॉकडाउन परवडणारे नाही. आता दुकाने बंद ठेवून चालणार नाही. केवळ दहा टक्क्यांवर व्यवसाय आला आहे. दुकानांचे भाडे परवडणारे नाही. स्पर्धा वाढली आहे. काहींनी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कामगारांचा पगार देणेही परवडत नाही. नागरिकांनीही मास्क वापरावेत. सॅनिटायझरचा वापर करावा किंवा सतत हात धुवावे.
- सुरेश खिंवसरा, सांगवी, किराणा माल घाऊक व्यापारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील उद्याने पूर्ण वेळ बंदच ठेवण्यात येणार आहेत. संचारबंदीचा आदेशही कायम असून बाहेर फिरणाऱ्या होमआयसोलेट रुग्णांवर गुन्हे दाखल केला जाणार आहेत.
- राजेश पाटील, आयुक्त, महापालिका