आम्ही लस घेतली...
लस घेऊन आठ दिवस झाले. आम्ही चौघी मैत्रिणी सोबत गेलो होतो. लस घेऊन आल्यानंतर घरातील सर्व कामे केली. त्यामुळे थोडा वेळ अंगदुखीचा त्रास झाला. नर्सने लस केव्हा टोचली हे जाणवलंही नाही. लसीमुळे काही त्रास होईल का? याची काळजी करण्याचे कारण नाही. अन्य महिलांनाही लस घेण्याबाबत आम्ही सांगत आहोत. - सिंधू नाईक, गिरिराज कॉलनी, बिजलीनगर, चिंचवड
मोहननगर येथील ईएसआय हॉस्पिटलमध्ये जाऊन लस घेतली. दहा दिवस झाले. केवळ दोन तास रांगेत थांबावे लागले. काही त्रास झालाच, तर डॉक्टरांनी दोन गोळ्या दिल्या होत्या. पण, मला काहीही त्रास झाला नाही. उलट आत्मविश्वास वाढला आहे. कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. लस घेण्याबाबत मित्रांनाही सांगितले आहे. - दिलीप शिंदे, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजजवळ, आकुर्डी रेल्वे स्टेशन
मी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. लस पूर्णतः सुरक्षित आहे. तिच्याबाबत आपल्या मनात कोणताच संदेह ठेऊ नये. पुढील तीन-चार दिवसांत ५० लसीकरण केंद्र सुरू केले जाणार आहेत. यामुळे ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व गंभीर आजार असलेले ४५ वर्षांवरील नागरिक यांना लसीकरण करणे सुकर होणार आहे. लसीचा डोस घेतल्यानंतरही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. लसीकरणानंतरही मास्क, सॅनिटायझर व सामासिक अंतर पाळणे आवश्यक आहे, यामुळे आपण आपले व आपल्या आजूबाजूच्यांचे संरक्षण करणार आहोत. - राजेश पाटील, आयुक्त, महापालिका
लसीकरणाने प्रतिकारक्षमता वाढते
एका व्यक्तीला दोन टप्प्यात कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. पहिल्या डोसनंतर आठ ते दहा दिवसांनी शरीरात अँटिबॉडीज (प्रतिपिंडे) तयार होतात. पहिला डोस घेतल्यानंतर साधारणतः ६५ टक्के प्रतिकार क्षमता शरीरात तयार होते. आणि दोन्ही डोस घेतल्यानंतर ७० ते ९० टक्के प्रतिकारक्षमता निर्माण होते, असे महापालिका अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.
दृष्टीक्षेपात लसीकरण
- २८ फेब्रुवारीपर्यंत : २२,८२६
- एक ते १४ मार्च : ३९,०५०
- १४ मार्चपर्यंत एकूण : ६१८७६
दृष्टीक्षेपात लसीकरण केंद्र
- एकूण केंद्र : २१
- महापालिका : ८
- नियोजित केंद्र : ५०