पुणे: ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते, इतक्यात...

 पुण्यातील हडपसरमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यात दोन जण अल्पवयीन आहेत. गावातील एका ज्वेलर्सवर ते दरोडा टाकणार होते.
हडपसर : हडपसर गावातील सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांचा समावेश आहे. आरोपींवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हत्यारे आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ओंकार नीलेश कोकरे (वय २१, रा. भैरवनाथ मंदिराजवळ, हिंगणेमळा), तन्मय अजित बेडगे (वय २० रा. हडपसर), प्रसाद कल्याण बिराजदार (वय २२, रा. कुंजीरवाडी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

हडपसर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सौरव माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दरोड्याच्या उद्देशाने गोसावी वस्ती, बिराजदारनगर झोपडपट्टीमागील कालव्याच्या रस्त्याकडेला बसले होते. त्यांच्या जवळ दोन दुचाकींसह लोखंडी हत्यारे असून, ते हडपसर गावातील एका सराफास लूटणार असल्याची माहिती सहायक निरीक्षक हनुमंत गायकवाड यांना मिळाली होती.

त्यानुसार तपास पथकातील पोलिसांनी बिराजदारनगर येथे धाड ‌टाकून पाचही जणांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाचही जणांना पाठलाग करून ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांनी हडपसर गावामधील सराफास लूटणार असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन दुचाकी व एक लोखंडी पालघन, एक कटावणी, दोन दोऱ्या, ब्लेड, मिरची पावडर असा एकूण ८० हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area