दत्तवाडीत दोघेजण व्हॉट्सअॅप स्टेट्सला तलवारी आणि घातक हत्यारांचे फोटो ठेवून दहशत निर्माण करीत आहेत.
पु
णे : व्हॉट्सअॅप स्टेटसला तलवारी आणि तीक्ष्ण हत्यारांचे फोटो ठेवणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. समाज माध्यमावर हत्यारांसह फोटो प्रसारित करीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली म्हणून सराईतासह दोघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अमर लक्ष्मण गायकवाड (वय २३, रा. जनता वसाहत) आणि भीमा शत्रुघ्न शिंदे (वय २२, वाघजाई मित्रमंडळ, जनता वसाहत) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दत्तवाडीत दोघेजण व्हॉट्सअॅप स्टेट्सला तलवारी आणि घातक हत्यारांचे फोटो ठेवून दहशत निर्माण करीत आहेत. त्यांच्याकडे हत्यार असल्याची माहिती पोलिस हवालदार कुंदन शिंदे आणि प्रमोद भोसले यांना मिळाली.
त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर आणि पोलिस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, पोलिस हवालदार कुंदन शिंदे, कर्मचारी प्रमोद भोसले, विष्णू सुतार, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, शरद राऊत, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर आणि बजरंग पवार यांच्या पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्याकडील तलवार आणि पालघन जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींमधील गायकवाड हा सराईत गुन्हेगार आहे. तो काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपला सतत शस्त्राचे फोटो ठेवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.