राष्ट्रीय तपास यंत्रणेने शनिवारी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. या मुद्द्यावर भाष्य करताना भाजप नेते प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली.
मुंबई: पोलीस दलातील वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी अटक करण्यात आली. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणात वाझेंचाही सहभाग असल्याचा आरोप ठेवत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्यांना अटक केली. सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा संशय हिरेन यांच्या पत्नीने व्यक्त केला होता. त्याचा दाखला देत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेंच्या अटकेची आणि निलंबनाची मागणी केली. सुरूवातीला वाझे यांची बदली करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. पण नंतर एनआयएने तपास केल्यानंतर त्यांनी वाझेंना ताब्यात घेतले आणि अखेर अटक केली. या मुद्द्यावर बोलताना भाजप नेते प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणीही केली.
"सचिन वाझे यांनी अखेर अटक झाली. मला असं म्हणावंसं वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातल्या ओसामा बिन लादेनलाच अटक झाली आहे. सचिन वाझे आणि त्यांच्या गँगला पाठीशी घालणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांचा नैतिकतेच्या पातळीवर राजीनामा घेण्यात यायला हवा. तसेच ज्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि विधानपरिषदेत सचिन वाझे हा ओसामा बिन लादेन आहे का असा प्रश्न विरोधी पक्षाला विचारला होता, त्या मुख्यमंत्र्यांनीदेखील नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे ही माझी स्पष्ट मागणी आहे", असं प्रसाद लाड म्हणाले.
"सचिन वाझेंच्या माध्यमातून एनआयएने जास्तीत जास्त माहिती गोळा करून मनसुख हिरेन प्रकरणाचा छडा लावावा. तसेच महाराष्ट्रात झालेल्या संशयास्पद आत्महत्यांचादेखील तपास करावा. सचिन वाझे यांच्या माध्यमातून आणखी किती लोकांच्या हत्या केल्या गेल्या, याची खात्री एएनआयने चौकशीदरम्यान केली पाहिजे", अशी मागणीदेखील त्यांनी केली.
दरम्यान, या प्रकरणावर भाजप नेते राम कदम यांनीही मत व्यक्त केलं. ठाकरे सरकार ज्या सचिन वाझेंचे प्रवक्ता असल्याप्रमाणे वागत होते, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, ते संपूर्ण देशाने पाहिले आहे. अखेर त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमची मागणी आहे की महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करायचे आदेश द्यायला हवेत म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाईल आणि महाराष्ट्राचे सरकार नक्की कोणाला पाठीशी घालायचा प्रयत्न करतंय तेदेखील समोर येईल असं मत राम कदमांनी व्यक्त केलं.