Sachin Vaze: सचिन वाझे यांना अखेर अटक; मॅरेथॉन चौकशीनंतर NIAची कारवाई

 Sachin Vaze: मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.


मुंबई, 14 :  मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ही कारवाई केली आहे.


एनआयए कडून सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात सचिन वाझे सकाळी ११.३०च्या सुमारास गेले होते. तिथे तब्बल १२ तास मॅरेथॉन चौकशी केल्यानंतर रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एनआयएच्या एका अधिकाऱ्याने अधिकृत माहिती दिली आहे. वाझे यांना रविवारी सुट्टीकालीन कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर कारमिखाइल रोडवर स्फोटकांसह स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आली होती. या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. भारतीय दंड विधानाच्या २८६, ४६५, ४७३, ५०६ (२), १२० ब आणि ४ (अ) (ब) (इ) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ अन्वये सचिन वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वाझे यांच्यावरील अटकेच्या कारवाईने एकच खळबळ उडाली असून हा राज्य सरकारसाठीही मोठा धक्का मानला जात आहे. वाझे यांच्यावर या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले होते. वाझे यांना निलंबित करून अटक करा अशीही मागणीही त्यांनी केली होती. मात्र, आधी चौकशी मग शिक्षा असा पवित्रा घेत सरकारने वाझे यांची केवळ खात्यांतर्गत बदली केली होती. आता वाझे यांना एनआयएने अटक केल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.


दरम्यान, अंबानी यांच्या घराजवळ ज्या कारमध्ये स्फोटकं ठेवण्यात आली होती त्या कारचा मालक मनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणी एटीएस मार्फत सचिन वाझे यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. त्यापाठोपाठ एनआयएने स्फोटकांप्रकरणी सचिन वाझे यांची चौकशी सुरू केली होती. 


त्यामुळे संभाव्य अटक टाळण्यासाठी वाझे यांनी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात शुक्रवारी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. या अर्जावर शनिवारी सुनावणी झाली असता वाझे यांना अंतरिम संरक्षण देण्यास ठाणे न्यायालयाने नकार दिला होता. प्रथमदर्शनी मनसुख यांच्या मृत्यू प्रकरणात वाझे यांचा सहभाग असल्याचे दिसते असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले होते. दुसरीकडे वाझे यांची एनआयएकडून चौकशी सुरू होती. 


मुंबईतील एनआयए कार्यालयात वाझे यांच्यावर एनआयएच्या पथकाने प्रश्नांचा भडीमार केला. त्यानंतर रात्री उशिरा वाझे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area