अखेर यवतेश्‍वरात सापडलेल्या मोबाईलवरुन मानवी सांगाड्याचे गुढ उलगडले

 वतेश्‍वर (ता. सातारा) येथील एका शेतात आज दुपारी मानवी हाडांचा सांगाडा सापडला.


सातारा :
यवतेश्‍वर (ता.सातारा) येथील एका शेतात आज दुपारी मानवी हाडांचा सांगाडा सापडला. याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना शोधादरम्यान त्याठिकाणी एक मोबाईल सापडला. या मोबाईलव्दारे तपास केला असता, मृत व्यक्‍ती मुनावळे (ता. सातारा) येथील असल्याचे समोर आले. याची प्राथमिक नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे. 

सांबरवाडी (ता. सातारा) येथे हणमंत शंकर भोसले हे राहण्यास असून त्यांना आज गावातील काहीजणांनी यवतेश्‍वर येथील सपकाळ यांच्या तुतीचे शेताजवळ मानवी सांगडा असल्याची माहिती दिली. यानुसार भोसलेंनी त्याठिकाणी जावून पाहणी करत याची माहिती सातारा तालुका पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर सातारा तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. पाहणीत त्यांना मानवी कवटी तसेच हाडांचा संपूर्ण सांगाडा शेतातील झाडाझुडुपांत पडल्याचे दिसले. त्याठिकाणाची पाहणी दरम्यान पोलिसांना एक मोबाईल सापडला. हा मोबाईल मृताचाच असावा, या शक्‍यतेने त्यांनी त्याची तपासणी केली. मोबाईल कार्डचे तांत्रिक विश्‍लेषण केल्यानंतर काही नंबर पोलिसांना मिळाले. 

यानुसार पोलिसांनी त्यापैकी काही नंबरवर फोन करत माहिती घेतली. यावेळी सदर मोबाईल क्रमांक हा मुनावळे (ता. सातारा) येथील संतोष पांडुरंग भोसले (वय 37) याचा असल्याचे समोर आले. यानंतर त्याचे नातेवाईक त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी सापडलेला मोबाईल, नंबर, त्यातील सिमकार्ड गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून परागंदा झालेल्या संतोषचाच असल्याचे पोलिसांना सांगितले. संतोष हा व्यसनांच्या आहारी गेला होता. यामुळे त्याचा नेहमी कुटुंबाशी वाद व्हायचा. वारंवारच्या वादाला कंटाळून त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. पत्नी माहेरी निघून गेल्यापासून संतोष हा परागंदा झाला होता. सुमारे अडीच ते तीन महिन्यांपूर्वी संतोष याचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. याची प्राथमिक नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली असून तपास उपनिरीक्षक मनोहर फरांदे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area