एटीएम कार्ड बदलणारी टोळी अटकेत; 65 कार्डसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

 


शिरवळ (जि. सातारा) :
एटीएम कार्डची अदलाबदल करून हातचलाखीने लाखो रुपयाला गंडा घालणाऱ्या आंतरराज्य टोळीतील चार संशयितांना शिरवळ पोलिसांनी नुकतीच अटक केली. संशयिताकडून राष्ट्रीयीकृत बॅंकेची 65 एटीएम कार्ड, आठ हजार शंभर रुपयांची रोकड व कार असा तीन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई आनेवाडी टोल नाक्‍यावर करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.


शिरवळ येथील नीलेश शिवाजी सुर्वे यांना आसले (ता. वाई) व इतर ठिकाणाहून आपल्या खात्यावरून पैसे गेल्याचे कळल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गोवा येथून या संशयिताचा पाठलाग करून आनेवाडी (ता. जावळी) येथील टोलनाक्‍यावर कार (एमएच 04 इटी 0389) ताब्यात घेऊन प्रीदप साहेबराव पाटील, विकी राजू वानखडे, किरण कचरू कोकणे व महेश पांडुरंग धनगर (सर्व रा. म्हारळगाव, उल्हासनगर ठाणे) या संशयितांना अटक केली. दरम्यान, खंडाळा न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची (ता. 15 मार्च) पोलिस कोठडी सुनावली.


एटीएममध्ये रांगेत थांबून दुसऱ्याला पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून लाखो रुपयांचा ही टोळी गंडा घालत असे. अद्यापपर्यंत कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश व गुजरात, तसेच नगर, सोलापूर या जिल्ह्यातीलही अनेक गुन्हे उघडीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे. यासंबंधी कोणाची तक्रार असल्यास शिरवळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक उमेश हजारे यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area