महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाचं 'देऊळ बंद'; पुणे पोलिसांचा महत्त्वाचा निर्णयपुणे, दि. ११ : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी शहरातील शिव मंदिरे बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी घरीच पूजाअर्चा करावी. मंदिरात दर्शनाला येऊ नये, असे आवाहन पोलिस प्रशासन आणि मंदिरांच्या विश्वस्तांनी केले आहे. मंदिरे बंद असली तरी पूजा आणि अभिषेक असे विधी पूजाऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

याबाबत शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या शिव मंदिरांच्या विश्वस्तांची बैठक घेण्यात आली होती. महाशिवरात्रीच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिरे बंद ठेवण्याचे आवाहन, त्यांना पोलिसांकडून करण्यात आले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाशिवरात्रीला भाविकांनी घरातच पूजा अर्चा करावी. मंदिरात दर्शनासाठी येऊन गर्दी करू, नये, असे आवाहन पोलिसांसोबतच मंदिरांच्या विश्वस्तांनी केले आहे.

शहरातील पाताळेश्वर लेणी, ओकांरेश्वर मंदिर, श्री तारकेश्वर मंदिर, श्री सोमेश्वर मंदिर, अरण्येश्वर, वाघेश्वर या महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोठा उत्सव साजरा केला जातो. तर अनेक ठिकाणी पूजा-अर्चा बरोबरच मंदिराबाहेर यात्रा भरल्याने विक्रेत्यांची रांग लागलेली असते. त्यामुळे यंदा गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी तीन दिवस अगोदरच मंदिर विश्वस्तांची बैठक घेतली. भाविकांना कोरोनाच्या संसर्ग वाढू नये म्हणून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसापासून शहरात कोरोना संसर्ग वाढत आहे. दिवसाचा आकडा हजाराच्या पार गेला आहे. अशात गर्दी होणे परवडणारे नाही. त्यामुळे प्रशासनाने महाशिवरात्रीला मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिराबाहेर तशा सूचना असलेल्या पाट्या देखील मंदिर विश्वस्तांना लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area