पालनकर्त्याच्या दफनानंतर दीड महिना तो तिथेच घुटमळतोय; श्वानाच्या प्रेमाची अनोखी कहाणी

 गडहिंग्लज (कोल्हापूर) : आजच्या धावत्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात माणूस माणसांपासून लांब जात असल्याचे चित्र आपण पाहतो; परंतु जीवापाड प्रेम करून बाळगलेले प्राणी त्याच ताकदीने पालकाला लळा लावतात, हेसुद्धा याच युगात घडत आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणून येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथील एका घटनेतून पाहायला मिळते. पालनकर्त्याच्या मृत्यूनंतरही एका श्‍वानाने लळा कायम ठेवला असून, पालकाला जेथे दफन केले आहे, त्याच परिसरात तहान-भूक हरपून तो दीड महिना घुटमळत आहे. ही घटना आश्‍चर्यजनक वाटत असली तरी ती काळीज पिळवटून टाकणारी आहे. येणेचवंडीतील शेतकरी एकनाथ दशरथ झळके यांनी ‘मुधोळ हाऊंड’ नावाच्या जातीवंत श्‍वानावर जीवापाड प्रेम केले. त्यांनी घेतलेल्या काळजीमुळे अवघ्या दीड-दोन वर्षांतच झळके आणि श्‍वानामध्ये अतूट नाते तयार झाले. दरम्यान, २९ जानेवारी रोजी झळके यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांचा मृतदेह घरापासून एक किलोमीटर लांब शेतात दफन केला आहे. त्यावेळी झळके कुटुंबीय व ग्रामस्थांसोबत हा श्‍वान शेताकडे गेला होता. दफन विधीनंतर नातेवाईक, ग्रामस्थ घरी पोहचले; पण हा श्‍वान तेथेच थांबला आहे. तो पाणी व पोटासाठी त्या परिसरातच भटकत आहे.

पाणी पिऊन पुन्हा तो दफनाच्या जागी असलेल्या आंब्याच्या झाडाखाली जातो. शेतवडीत काम करणाऱ्यांनाही याचे आश्‍चर्य वाटू लागले. त्याला पकडण्याचाही प्रयत्न झाला; परंतु तो कोणाला सापडत नाही. प्राण्यांचे आपल्या पालकावर प्रेम असण्यासह पालक सांगतील त्या पद्धतीने ते वागतही असते, हे सर्वश्रुत आहे; परंतु पालनकर्त्याच्या मृत्यूनंतरही त्यांच्या मृतदेहाला लळा लावणाऱ्या या श्‍वानाची कहाणी काळजाला भिडणारीही आहे.  श्‍वानाची प्रकृती खालावली आपल्या पालनकर्त्याला दफन केलेल्या जागेपासून शंभर-दोनशे मीटरच्या परिसरातच तहान-भूक हरपून हा श्‍वान भटकत आहे. त्याच परिसरातील सावलीत झोपते. शेतात काम करणारे लोक डब्यातील भाकरीचा तुकडा त्याला देतात; परंतु त्यालासुद्धा तो तोंड लावत नाही. केवळ पाणी पिऊन तो जगत आहे. दीड महिना झाला अन्नाचा कणही त्याच्या पोटात न गेल्याने त्याची प्रकृती खालावली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area