शाखाप्रमुख या नात्याने घेतलेला योग्य वेळी योग्य निर्णय आणि शिक्षकांकडून त्याची कठोर अंमलबजावणी झाल्यामुळे शाळेतील कोरोना प्रादुर्भावाची साखळी काही दिवसांतच खंडित झाली अशी प्रतिक्रिया संध्या चौगुले (मुख्याध्यापिका, सेवागिरी विद्यालय, पुसेगाव) यांनी दिली.
कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांना आधार देण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबातील संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरले, असेही त्यांनी सांगितले. एक विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आल्यानंतर शाळा बंद करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांना फोन करून विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करून घेण्याविषयी शाळा आग्रही राहिली. सर्व विद्यार्थ्यांना घरात विलगीकरण करण्याचे आवाहन केले. ज्या विद्यार्थ्यांची घरे लहान होती, त्यांचे आरोग्य केंद्रांमध्ये विलगीकरण करण्यात आले. शिक्षक व कर्मचारी सलग आठ दिवस विद्यार्थ्यांसाठी दवाखान्यात राहिले व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केले. विलगीकरण कक्षातील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी शाळेतर्फे विद्यार्थ्यांना गोष्टींची पुस्तके तसेच फळे व जेवण पोचविण्यात आले. श्रीमती चौगुले यांनी शिक्षकांसोबत बाधित विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सुरक्षित अंतराचे पालन करत त्यांना प्रत्यक्ष भेटून नैतिक व मानसिक आधार दिला.
प्रत्येक बाधित विद्यार्थ्याच्या घरातील सर्व सदस्यांची आरटीपीसीआर टेस्ट होईपर्यंत शिक्षकांमार्फत पाठपुरावा करण्यात आला. या उपायांच्या अंमलबजावणीसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाने अपार मेहनत घेतल्याने विद्यार्थ्यांमुळे बाधित होणाऱ्या पालकांची संख्या केवळ दोनपर्यंत रोखली गेली.
शाखाप्रमुख या नात्याने घेतलेला योग्य वेळी योग्य निर्णय आणि शिक्षकांकडून त्याची कठोर अंमलबजावणी झाल्यामुळे शाळेतील कोरोना प्रादुर्भावाची साखळी काही दिवसांतच खंडित झाली. - संध्या चौगुले, मुख्याध्यापिका, सेवागिरी विद्यालय, पुसेगाव