कोल्हापूर, दि.१२ : दस्त नोंदणी, फेरफारची कामे वेळेत होत नाहीत. जी कामे होतात, ती तलाठ्यांऐवजी पंटरांकडूनच करुन घेतली जात आहेत. ज्याचे पाकिट वजनदार त्यांनाच प्राधान्य देवून दस्त नोंदणीसह इतर कामे करुन दिली जात असल्याचे चित्र अपवाद वगळता सर्वच तलाठी कार्यालयात दिसून येत आहेत. जिल्ह्यातील कार्यालयात तलाठीच पूर्ण वेळ नसतो. त्यांच्याकडून कामे होत नाहीत. तलाठ्यांनी नियुक्त केलेली इतर लोकच दस्तनोंदणीची कामे करतात. जो जास्त वजनाचे पाकिट देतो. त्याचे काम तत्परतेने होते. ज्यांच्याकडून काही मिळत नाही, अशांची कामे आज-उद्याची उत्तरे देवून पुढे ढकलली जातात. कोल्हापूर शहर असो किंवा नगरपरिषद परिसरातील गावांमध्ये जमिनींचे दस्त नोंदणी, फेरफारची कामे मोठ्या प्रमाणात होत असतात. सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली असो किंवा नियम अटींची पूर्तता असो. पाकिटांशिवाय तलाठ्यांची कामे होतच नाहीत, असे चित्र आहे. काही तलाठ्यांच्या अपवाद वगळता सर्रास हे काम सुरु आहे.
जो पाकिट देत नाहीत, अशांना तलाठी आलेले नाहीत म्हणून सांगून कार्यालयातून बाहेर काढले जाते. तर, ज्याच्याकडून लाभ आहे. अशांना तलाठ्यांचा साधा फोन आला तरीही तिथे नियुक्त केलेली लोक दस्त नोंदणी सह फेरफारची कामे करतात. तलाठ्यांनीही जी वेळ नियुक्त करुन दिली आहे. त्या-त्या वेळेला तलाठी कार्यालयात उपस्थित राहिले पाहिजे. पण ठराविक तलाठी वगळता बहुतांश तलाठी कार्यालयात उपस्थित राहत नाही. यावर त्यांचे वरिष्ठ असणारे अधिकारीही लक्ष देत नाहीत. त्यामुळे लोकांना तलाठी कार्यालयाच्या चकारा माराव्या लागत आहेत.
"तलाठ्यांनी आपल्या वेळा पाळल्या पाहिजेत. तलाठ्यांनी कार्यालयात असलेच पाहिजे. यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी याची माहिती घेतली पाहिजे. अशा सूचना दिल्या जातील."
- भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर याकडे लक्ष दिले पाहिजे
- तलाठ्यांनी वेळेची मर्यादा पाळावी
- फेरफार, दस्त नोंदणी गतीने व्हावी
- सर्वसामान्यांची दखल घ्यावी