कमल हसन यांच्या गाडीवर युवकाचा अयशस्वी हल्ला; कार्यकर्त्यांनी केली मारहाण

 तमीळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अभिनेते कमल हसन कोयंबतूर दक्षिण या मतदार संघातून विधानसभा लढणार आहेत.


चेन्नई :
 तमीळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अभिनेते कमल हसन कोयंबतूर दक्षिण (coimbatore south) या मतदार संघातून विधानसभा लढणार आहेत. हसन यांनी शुक्रवारी आपला पक्ष मक्कम निधी मय्यमच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. तमीळनाडूमध्ये 6 एप्रिलपासून निवडणुका होणार आहेत. यादृष्टीने कमल हसन यांनी तयारी चालवली आहे. मात्र, अभिनेता कमल हसन यांच्या गाडीवर काल रविवारी एका युवकाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. कमल हसन कांचीपुरममध्ये निवडणूक प्रचार केल्यानंतर परत चेन्नईमधील हॉटेलमध्ये निघाले होते, तेंव्हा ही घटना घडली आहे. मात्र, हा हल्ला करणारा व्यक्ती कमल हसन यांचाच फॅन असल्याचं सांगितलं जात आहे.

पक्षाच्या एका नेत्याने सांगितलं की, या घटनेमध्ये हसन यांना कसल्याही प्रकारची इजा झाली नाहीये. मात्र, त्यांच्या वाहनाची मोडतोड झालीय. MNM चे नेता एजी मौर्य यांनी ट्विट करुन या घटनेची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलंय की, हसन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या आरोपी युवकाने दारू पिली होती, अशीही माहिती देण्यात आली आहे. या घटनेनंतर MNM च्या काही कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्याला मारहाण केल्याचं समजतंय. त्यानंतर पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. 

तमीळनाडू राज्यात विधानसभेच्या निवडणूका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीमध्ये कमल हसन यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार उभे केले आहेत. यासाठी सध्या तो जोरदार प्रचारदौरे करत आहेत. काल प्रचार संपल्यानंतर ते आपल्या हॉटेलमध्ये परतत होते. मात्र, तेंव्हा एका दारुच्या नशेतील व्यक्तीने त्यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जबरदस्तीने कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिथे उपस्थित कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली.  पहिल्यांदाच कमल हसन यांचा पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत त्यांचा पक्ष आघाडी करेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. पण, रजनीकांत यांनी तब्येतीच्या कारणास्तव निवडणुका न लढण्याचा निर्णय घेतला. कमल हसन यांनी भ्रष्टाचार मुक्त सरकार देण्याचं वचन दिलं आहे. तसेच महिलांसाठी त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.   


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area