पाहुण्याकडे गेले अन्‌ इकडे चोरांनी घर फोडले ! गोवा टूरचा खर्च मागितल्याने मित्रांनीच लाकडाने बदडले मित्राला

 सत्तर फूट रोडवरील भारतरत्न इंदिरा नगरातील आनंद श्रीकांत कनका हे त्यांच्या परिवाराला भेटण्यासाठी इंदापूरला गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांचे घर फोडून घरातील दहा हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
सोलापूर : सत्तर फूट रोडवरील भारतरत्न इंदिरा नगरातील आनंद श्रीकांत कनका हे त्यांच्या परिवाराला भेटण्यासाठी इंदापूरला गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांचे घर फोडून घरातील दहा हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना 13 ते 14 मार्चच्या दरम्यान घडल्याची फिर्याद कनका यांनी सदर बझार पोलिसांत दिली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. शेख हे करीत आहेत. 


फिरायला गेलेल्या खर्चाचे पैसे मागितले म्हणून मारहाण  

गोव्याला फिरायला गेल्याचा खर्च मागताच एकाला मारहाण करण्यात आली. ही घटना नीलमनगर येथे घडली. नीलमनगर भाग - चार (एमआयडीसी) येथील नरसिंगमल्लू यादगिरी कोडम हे मित्रासह गोव्याला वाहनातून 9 मार्च रोजी फिरायला गेले होते. 11 मार्च रोजी ते पुन्हा सोलापुरात परतले. त्या ठिकाणी राहण्याचा व खाण्यासह अन्य खर्च सर्वांनी मिळून करायचे ठरले होते. सर्व खर्च एकत्र कोडम यांनी केला. त्यानंतर कोडम यांनी त्या मित्रांकडून प्रत्येकी येणाऱ्या हिशेबाचे पैसे मागितले. पैसे का मागतो म्हणून आठ जणांनी लाकडी बांबूने मारहाण करीत शिवीगाळ केली, अशी फिर्याद कोडम यांनी दिली. त्यानुसार मल्लू गळगुंडी, सातप्पा मेंडी व त्याच्या तीन - चार मित्रांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. पेटकर हे करीत आहेत. 


एका दिवसात 76 हजारांचा दंड 

 शहरातील कोरोनाचा जोर वाढू नये, म्हणून शहर पोलिसांकडून सात पोलिस ठाण्यांतर्गत बेशिस्तांवर कारवाई केली जात आहे. मास्कविना फिरणाऱ्या 132 जणांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यांच्याकडून 66 हजारांचा दंड वसूल केला आहे. दुसरीकडे, अन्य नियमांचे उल्लंघन केलेल्यांना दहा हजारांचा दंड केला आहे. शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे. 


पेट्रोलिंग करताना अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त  

विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करताना गुन्हे प्रकटीकरण पथकाला दोन तरुण विजयपूर रोड परिसरात थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांना विश्‍वासात घेऊन विचारले असता, त्यांच्याविरुद्ध यापूर्वी तीन गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेला दोन लाख 57 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात 71 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक दुचाकी, तीन गॅस सिलिंडर आणि काही रोकडचा समावेश आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजय जगताप, पोलिस उपनिरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, संजय मोरे, राजकुमार तोळणुरे आदींनी केली. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area