बँकेतच तरुणाला लुटले

 बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाला दोघा भामट्यांनी बोलण्यात गुंतवून त्याच्याजवळ असलेल्या १ लाख रुपयांच्या रक्कमेतील २७,५०० रुपयांच्या नोटा चोरून पलायन केल्याची घटना कळंबोलीतील पंजाब नॅशनल बँकेत शुक्रवारी दुपारी घडली.

नवी मुंबई: बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाला दोघा भामट्यांनी बोलण्यात गुंतवून त्याच्याजवळ असलेल्या १ लाख रुपयांच्या रक्कमेतील २७,५०० रुपयांच्या नोटा चोरून पलायन केल्याची घटना कळंबोलीतील पंजाब नॅशनल बँकेत शुक्रवारी दुपारी घडली. कळंबोली पोलिसांनी या घटनेतील दोघा भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे

या प्रकरणात फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव प्रवेशकुमार तिवारी (२३) असे असून तो कळंबोलीतील श्री बालाजी रोड कॅरिअर्स येथे कामाला आहे. तसेच तो त्याच ठिकाणी राहाण्यास आहे. शुक्रवारी दुपारी श्री बालाजी रोड कॅरिअर्स कंपनीच्या मालकाने प्रवेशकुमारला बँकेतून १ लाख रुपये काढून आणण्यासाठी त्याला चेक दिला होता. त्यानुसार प्रवेशकुमार कळंबोलीतील पंजाब नॅशनल बँकेत गेला होता. यावेळी प्रवेशकुमार याने बँकेतून १ लाख रुपयांची रक्कम काढल्यानंतर रक्कम मोजत उभा होता. याचवेळी त्याच्याजवळ आलेल्या एका भामट्याने बँकेकडून देण्यात आलेल्या नोटांमध्ये काही नोटा डुफ्लिकेट असण्याची शक्यता असल्याने नोटा रबर काढून व्यवस्थित मोजण्याचा सल्ला दिला. त्यामुळे प्रवेशकुमार याने नोटांचे बंडल काढले, मात्र रबर खाली पडल्याने सदरचे रबर उचलण्यास प्रवेशकुमार वाकला.

याचवेळी दुसऱ्या भामट्याने त्याला रबर उचलून देण्याचा बहाणा करून त्याचे लक्ष विचलित केले. तर पहिल्या भामट्याने याचवेळी प्रवेशकुमारने ठेवलेले नोटांचे बंडल आपल्याकडे घेऊन त्यातील २७ हजार ५०० रुपयांच्या नोटा काढून घेतल्या. त्यानंतर त्याने सदर नोटा मोजण्यात आल्याचे प्रवेशकुमारला सांगून त्या ठिकाणावरून पलायन केले. त्यानंतर प्रवेशकुमार नोटांचे दोन्ही बंडल घेऊन आपल्या कार्यालयात गेल्यानंतर त्याने नोटा मोजल्या. यावेळी या नोटांच्या बंडलमध्ये २७ हजार ५०० रुपये कमी असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यांनतर बँकेत त्याच्याजवळ नोटा मोजण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघा भामट्यांनीच लुबाडल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोघा भामट्यांविरोधात फसवणुकिचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area