टीआरपी घोटाळ्यात ३२ कोटींची मालमत्ता जप्त

 टीआरपी घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी मोठी कारवाई केली. त्याअंतर्गत तब्बल ३२ कोटी रुपयांची मालमत्ता चार शहरांमधून जप्त करण्यात आली आहे.


मुंबई:
टीआरपी घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी मोठी कारवाई केली. त्याअंतर्गत तब्बल ३२ कोटी रुपयांची मालमत्ता चार शहरांमधून जप्त करण्यात आली आहे. तीन वाहिन्यांच्या मालमत्तेचा त्यात समावेश आहे.


बनावटरित्या वाहिन्यांचा टीआरपी वाढवून त्याआधारे अधिक जाहिरात मिळविण्याचा घोटाळा मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला होता. त्याचा 'ईडी'कडूनही तपास सुरू आहे. त्याअंतर्गत 'फक्त मराठी', 'बॉक्स सिनेमा' व 'महा मुव्ही' या वाहिन्यांच्या मुंबई, इंदूर, दिल्ली व गुरुग्राम येथील मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.


'ईडी'तील सूत्रांनुसार, 'यापैकी दोन वाहिन्यांचे २५ टक्के टीआरपी हे फक्त पाच घरांमधून येत असल्याचे तपासात समोर आले आहे. मुख्य म्हणजे, या पाच घरांचा एकूण टीआरपी हा मुंबईतील एकूण टीआरपीच्या १२ टक्के आहे. अशाप्रकारे टीआरपी वाढवून त्याआधारे या वाहिन्यांनी जाहिराती मिळवल्या. या वाहिन्यांनी अशाप्रकारे टीआरपी बनावटरित्या वाढवून त्याद्वारे तब्बल ४६.७७ कोटी रुपयांच्या जाहिराती गोळा केल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळेच ३२ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.'


'ईडी'ने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये जमिनी, व्यावसायिक जागा तसेच निवासी संकुलांचा समावेश आहे. यापैकी व्यावसायिक जागा मुंबई व दिल्लीतील आहेत, तर जमिनी गुरुग्राम आणि इंदूर येथील आहेत. मुंबईतीलच निवासी संकुलांचाही समावेश आहे. मुख्य म्हणजे, याच घोटाळ्यात मुंबई पोलिसांकडून रिपब्लिक टीव्हीविरुद्धदेखील तपास सुरू आहे. पण 'ईडी'ने केलेल्या कारवाईत रिपब्लिक टीव्हीचा कुठलाही उल्लेख नाही.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area