महाराष्ट्रातील सरकार घालवण्याचे प्रयत्न सुरू आहेत; आठवलेंचा गौप्यस्फोट

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Ramdas Athawale On Maha Vikas Aghadi Government)
सांगली: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याबद्दल भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा अद्याप सुरू असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'राज्यातील सरकार घालवण्याचे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व आमचे प्रयत्न सुरू आहेत,' असं आठवले यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं आहे. (Ramdas Athawale On Maha Vikas Aghadi)

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात हे सरकार लवकरच पडेल, अशी वक्तव्ये भाजप नेत्यांकडून केली जात होती. अनेकदा डेडलाइनही दिल्या जात होत्या. मात्र, वर्षभरानंतर ही चर्चा थांबली. त्यानंतर, हे सरकार पाडण्याची गरज नाही. ते अंतर्विरोधानं पडेल, असा सूर भाजपच्या नेत्यांनी लावला होता. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधीर मुनगंटीवार यांनी या सरकारकडं तीन महिने उरले असल्याचं वक्तव्य केलं. त्यामुळं चर्चेला उधाण आलं होतं. राज्यातील सरकार पाडण्याचे भाजपचे पडद्याआडून प्रयत्न सुरू आहेत की काय, असं बोललं जाऊ लागलं. नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारलं असता, त्यांनी स्मितहास्य करून 'हा प्रश्न सुधीरभाऊंनाच विचारा' असं म्हणत उत्तर देणं टाळलं. मात्र, आठवले यांच्या वक्तव्यामुळं पडद्यामागे नक्कीच काहीतरी घडत असावं, हे आता स्पष्ट झालं आहे.

सांगली येथे आज आठवले यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. 'राजकारणात काहीही होऊ शकतं. कदाचित नाना पटोले सुद्धा आमच्या सोबत पुन्हा येऊ शकतात. पण राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे सत्तेत राहील, अशी परिस्थिती नाही. हे सरकार घालवून आमचं सरकार आणण्याचा फडणवीस, चंद्रकांतदादा आणि माझा प्रयत्न सुरू आहे,' असं आठवले म्हणाले.

...तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावाली लागेल!

'महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि करोनाची परिस्थिती देखील गंभीर आहे. अशीच परिस्थिती राहिली तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा विचार करावा लागेल. राष्ट्रपती राजवट लागू होण्याची वेळ येऊ नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलं काम करून कायदा आणि सुव्यवस्था सुधारावी,' असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area