भाजपचे ‘भद्र बंगाली बाबूबहुल’ भागांवर लक्ष

 बंगालच्या निवडणुकीत भाजप यापुढील काळात ग्रामीण बंगाल बरोबरच ‘शहरी’ म्हणजे भद्र बंगाली बाबूंची बहुसंख्य असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. विशेषतः ‘कोलकता परगणा (प्रोव्हिन्स)’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच जिल्ह्यांवरदेखील भाजपच्या प्रचाराचा जोर राहणार आहे.
‘कोलकता परगणात’ विधानसभेच्या प्रचाराचा जोर ठेवणार 

नवी दिल्ली - बंगालच्या निवडणुकीत भाजप यापुढील काळात ग्रामीण बंगाल बरोबरच ‘शहरी’ म्हणजे भद्र बंगाली बाबूंची बहुसंख्य असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. विशेषतः ‘कोलकता परगणा (प्रोव्हिन्स)’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच जिल्ह्यांवरदेखील भाजपच्या प्रचाराचा जोर राहणार आहे.  महाराष्ट्राचे माजी मंत्री व हरियाना प्रभारी विनोद तावडे (डायमंड हार्बर व मथुरापूर) व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान (उत्तर कोलकत्यातील ९ मतदारसंघ) यांच्यासह २२ निवडक नेत्यांवर बंगालच्या विविध भागांची जबाबदारी वाटून देण्यात आल्याचे भाजप सूत्रांनी ‘सकाळ’ ला सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अपघाताची कोणतीही सहानुभूती तृणमूल कॉंग्रेसला मिळू शकणार नाही, असा भाजपचा दावा आहे.


पक्षसूत्रांनी नमूद केले की ग्रामीण बंगालमध्ये पंतप्रधान मोदींचा करिष्मा दिसून येत आहे. ‘पीएम किसान’ सह अन्य गरीबकेंद्रीत केंद्रीय योजनांना ममता सरकारने नो एंट्री करून गरिबांचे कल्याण रोखले. या सूत्राभोवती फिरणाऱ्या भाजपच्या प्रचाराला ग्रामीण बंगालमधून प्रतिसाद मिळत आहे. मात्र शहरी भागातील नागरिकांचा कौल अद्यापही भाजपच्या लक्षात येत नाही.


ब्रिटीशकाळात बंगालमध्ये कोलकता, मिदनापूर, वर्धमान व मालदा हे चार प्रमुख परगणे (प्रोव्हीन्स) मानले जातात. प्रत्येकाचा टापू अंदाजे ५ ते ७ जिल्ह्यात पसरलेला आहे. भाजपच्या मते कोलकता प्रोव्हिन्सच्या जनमताचा अंदाज अद्याप येत नाही. हा भाग भद्र लोक व जमीनदारांचा भाग मानला जातो. कोलकत्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांसह हावडा, नादिया, उत्तर व दक्षिण २४ परगणा हे चार ते ५ मोठे जिल्हे या भागात येतात. मुख्यत्वे याच सुमारे १०० जागांवर आधी कॉंग्रेस, मग माकप व आता तृणमूल विधानसभेत जात असल्याचे इतिहास सांगतो. दरम्यान, भाजप बुद्धिवादी लोकांच्या मेळाव्यांवर पक्ष भर देणार असल्याचे सूत्रांने सांगितले.


मोदींच्या करिष्म्यांवर अवलंबून 

ममता दीदींकडून फुटून भाजपवासी झालेले निवडक चेहरे व त्यांची निवडक प्रभाव क्षेत्रे सोडली तर संपूर्ण पश्‍चिम बंगाल लक्षात घेता भाजपला पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळेच पहिल्या दोन टप्प्यांसाठी मोदींच्या आणखी चार सभा घेण्यात येत आहेत. २७ मार्च व १ एप्रिलला होणाऱ्या पहिल्या २ टप्प्यांतील (किमान ६० जागा) भाजप प्रचाराचा नारळ मोदींनी नुकताच फोडला. पाठोपाठ ते आता पुढच्या १० दिवसांत पुरुलिया, बांकुरा, खरगपूर व कोन्ताई येथेही सभा घेतील अशी माहिती आहे. पहिल्या दोन टप्प्यांत राज्यातील ९ जिल्ह्यांत मतदान होईल. याच टप्प्यात ममता दीदी व सुवेंदू अधिकारी यांच्यातील उत्कंठापूर्ण नंदीग्रामचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area