... तर त्यांना आरोपी का केले नाही? हायकोर्टाचा मुंबई पोलिसांना सवाल

 'कथित टीआरपी घोटाळा प्रकरणात एआरजी आऊटलायर मीडियाच्या रिपब्लिक टीव्हीविरोधात आणि या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याचे तुमचे म्हणणे असेल, तर तुम्ही आतापर्यंत त्यांना आरोपी का केले नाही?


मुंबई :
'कथित टीआरपी घोटाळा प्रकरणात एआरजी आऊटलायर मीडियाच्या रिपब्लिक टीव्हीविरोधात आणि या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याचे तुमचे म्हणणे असेल, तर तुम्ही आतापर्यंत त्यांना आरोपी का केले नाही? त्यांना केवळ संशयित म्हणून का दाखवले आहे?', असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई पोलिसांना केला. तसेच त्यांच्याविरोधात आरोपी म्हणून तपास करणार आहात की नाही आणि करणार असाल, तर किती दिवसांत पूर्ण करणार आहात, हे आज, गुरुवारी स्पष्ट करण्याचे तोंडी निर्देशही न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले.


या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती करणाऱ्या याचिका एआरजी कंपनी व गोस्वामी यांनी केल्या आहेत. त्याविषयी न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सध्या सुनावणी सुरू आहे.


'पोलिसांनी आरोपपत्रात एआरजीच्या अनेक कर्मचाऱ्यांना केवळ संशयित म्हणून दाखवले आहे. परंतु, त्यांना आरोपी म्हणून दाखवण्यासाठी त्यांच्याकडे सबळ पुरावे नाहीत. पुरावे असतील, तर ते पोलिसांनी दाखवायला हवेत. तपास कायमचा सुरू ठेवून प्रकरण असेच तापत ठेवले जाऊ शकत नाही', असा युक्तिवाद एआरजी व गोस्वामी यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अॅड. अशोक मुंदरगी यांनी मांडला. तेव्हा, 'यांच्याविरोधात पोलिसांकडे पुरेसे पुरावे असून आणखी अधिक पुरावे जमवण्याचे काम सुरू आहे', असे म्हणणे पोलिसांतर्फे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी मांडले.


त्यावेळी 'पुरेसे पुरावे असतील, तर त्यांना अद्याप आरोपी का केलेले नाही? याचिकादारांचे असे म्हणणे आहे की, आपल्याविरोधात पोलिसांकडून काही तरी कठोर कारवाई होईल, अशी भीती त्यांना सतत वाटत असते. एकीकडे पुरावे असल्याचे तुम्ही म्हणता आणि दुसरीकडे त्यांना थेट आरोपीही करत नाही. मग त्यांच्यावर अशी टांगती तलवार का ठेवायची? फौजदारी कायद्यात संशयित, असा कोणता प्रकार आहे, असे आम्हाला तरी वाटत नाही', असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.


'किती दिवसांत पूर्ण करणार?'

अखेरीस याचिकादारांविरोधात आरोपी म्हणून तपास करणार की, नाही आणि करणार असाल तर किती दिवसांत पूर्ण करणार, हे स्पष्ट करण्याचे तोंडी निर्देश पोलिसांना देऊन खंडपीठाने आज, गुरुवारी याविषयी पुन्हा सुनावणी ठेवली.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area