इचलकरंजीत पाणीप्रश्‍नी महिला हंड्यासह रस्त्यावर

 शहरातील मंगळवार पेठ हा विस्तृत भाग आहे. परिसरात मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू आहे
इचलकरंजी - 
पाणी टंचाईप्रश्‍नी आज मंगळवार पेठ परिसरातील महिलांनी महात्मा गांधी पुतळा चौकात सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. शहरातील हा मुख्य मार्ग असल्याने वाहनधारकांना पर्यायी मार्ग शोधावा लागला. पाणी सोडल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका आंदोलक महिलांनी घेतली. तासाभरात पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. 

शहरातील मंगळवार पेठ हा विस्तृत भाग आहे. परिसरात मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. चार दिवसांपासून पाणी न आल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शेजारी असलेल्या परिसरात मात्र दोन दिवसांआड नियमित पाणी आल्याने नागरिकांमध्ये चीड निर्माण होऊन त्याचा आज उद्रेक झाला. संतप्त महिलांनी महात्मा गांधी पुतळा परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. वर्दळीच्या मार्गावरच हे आंदोलन केले. त्यामुळे वाहनधारकांना अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला. सुमारे तासभर हे आंदोलन केले. 

पाणीपुरवठा विभागाचे अभियंता बाजीराव कांबळे यांच्यावर महिला व नागरिकांनी प्रश्‍नांची सरबत्ती केली. केवळ 10 ते 15 मिनिटेच पाणी येत असल्याबाबत नागरिकांनी तक्रार केली. पुरेसे पाणी देणार नसाल तर पाणीपट्टी भरणार नाही, असा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला. नगरसेवक राहुल खंजीरे, नगरसेविका ध्रुवती दळवाई, माजी नगरसेवक सुभाष नेमिष्टे यांनीही अनियमित पाणीपुरवठ्याबद्दल तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केल्या.  उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे आंदोलनस्थळी आले. त्यांनी जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. हा पुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे आश्‍वासन दिले. पण, पाणी सोडल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर पाणीपुरवठा सुरू केल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area