दवाखान्यातून डिस्चार्ज मिळालेल्या आईसाठी दहा ते बारा किलोमीटरचा डोंगरदऱ्यांतून प्रवास
काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे पानशेतला येण्यास दळणवळणाची सोय नसल्याने डोंगर उतरून रायगड जिल्ह्यातील महाड येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाल्या होत्या, पण शरीर साथ देईना. म्हणून शेवटचे दिवस आपल्या घरातच घालवावे म्हणून थोड बरं वाटू लागल्याने त्यांनी घरी येण्याची इच्छा मुलाकडे व्यक्त केली. मुलाने आईच्या इच्छेखातर घरी येण्याची तयारी केली. दोन दिवसांपूर्वी दोघेही महाडवरुन बीरवाडीमार्गे पानेगावपर्यंत खाजगी वाहनाने आले. पण त्यानंतर त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. सदर महिलेचा मुलगा बाळू सांगळे आणि दीर मारुती धोंडीबा सांगळे या दोघांनी चादर आणि लाकडाच्या साहाय्याने डोली करत दहा ते बारा किलोमीटर डोंगर चढून महिलेला चांदर गावात सुखरुप पोहोचवले, अशी माहिती येथील स्थानिक नागरिक रामचंद्र ढेबे यांनी दिली.
आजच्या युगातील श्रावणबाळाने आईची इच्छा पूर्ण केली, पण सदर वृध्द महिला आता शेवटच्या घटका मोजत आहे. त्यांच्यावर पुढील उपचार होतील का? का अंथरुणात खितपत पडूनच शेवटच्या घटका मोजाव्या लागतील? याठिकाणी सरकारी आरोग्य यंत्रणा कधी पोहचेल? असे प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पानशेत परिसरातील युवा कार्यकर्ते अजिंक्य पोळेकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, आरोग्यसेवा आणि राजकीय अनास्था यावर जोरदार टीका केली आहे.
याबाबत येथील स्थानिक जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे म्हणाले की, ''अनेक दिवसांपासून या भागातील रस्त्यांच्या कामासाठी निधीची कमतरता होती; परंतु जिल्हा नियोजनातून काही निधी मंजूर झाला असून माणगाव ते चांदर या बारा किलोमीटरपैकी तीन किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले असून काही ठिकाणी वनखात्याच्या परवानगीमुळे कामात अडचणी येत आहेत.''