झोमॅटो वाद : डिलिव्हरी बॉयवर मारहाणीचा आरोप करणारी हितेशा फरार; प्रकरणात नवा ट्विस्ट

 या प्रकरणात कामराजची चूक नसून आरोप करणाऱ्या हितेशाचीच चूक असल्याचा खुलासा नुकताच झाला होता. त्यानंतर आता पुन्हा या प्रकरणाला नव वळण मिळालं आहे.

झोमॅटोचा (Zomato) डिलिव्हरी बॉय कामराजकडून (Kamaraj) बंगळुरुतील हितेशा चंद्राणी (Hitesha Chandrani) नामक महिलेला कथित मारहाण प्रकरणं गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. या प्रकरणात कामराजची चूक नसून आरोप करणाऱ्या हितेशाचीच चूक असल्याचा खुलासा नुकताच झाला होता. त्यानंतर आता पुन्हा या प्रकरणाला नव वळण मिळालं आहे. हितेशाने बंगळुरू येथून पळ काढल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 


द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, हितेशा चंद्राणी हीने मारहाणीचा आरोप केल्यानंतर या आरोपांचे खंडन करताना डिलिव्हरी बॉय कामराजने सोमवारी बंगळुरू पोलिसांत हितेशाविरोधात FIR दाखल केला. यानंतर हितेशा बंगळूरू शहरातून पळून गेली आहे. डिलिव्हरी बॉयच्या विरोधी तक्रारीनंतर पोलिसांनी हितेशाची चौकशी केली होती. दरम्यान, या वादामध्ये सोशल मीडियात हितेशाच्या घराचा पत्ताही शेअर झाला होता.  

दरम्यान, झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयनं आपल्याला मारहाण केल्याचा हितेशाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर झोमॅटोने यावर स्पष्टीकरण दिलं होतं. संबंधित डिलिव्हरी बॉयचं झोमॅटोतील काम चांगलं असून त्याला ग्राहकांनी हाय रेटिंग दिल्याचं झोमॅटोनं सांगितलं होतं. हितेशा चंद्राणीला डिलिव्हरी देण्यात उशीर झाल्यामुळे तिनेच झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचं झोमॅटोनं म्हटलं होतं. 


बंगळूरू पोलिसांनी सांगितले की, "कामराजने हितेशाविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही तिला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली होती. मात्र, तिने पोलिसांना कळवले की तिने बंगळुरु शहर सोडले असून ती आता महाराष्ट्रात तिच्या मावशीकडे रहायला आली आहे. पण आम्ही तिला बंगळुरूत परतल्यानंतर आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळही दिला आहे, तोपर्यंत याचा तपास सुरुच राहिलं असंही तिला कळवलं आहे. पण, जर ती चौकशीसाठी पुन्हा शहरात आली नाही तर आम्ही तिला अटक करु, असंही पोलिसांनी सांगितलं. 


दरम्यान, कामराजने म्हटलं की, "आपण तिला मारलं नव्हतं तर तिनेच  मला मारण्यासाठी चप्पल उगारली होती यावेळी मी तिचा हात पकडत रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिचाच हात तिला लागला यावेळी तिच्या बोटातील अंगठी तिच्या नाकाला जोरात लागल्याने तिच्या नाकातून रक्त येऊ लागले. मात्र, तिने असा बनाव केला की मीच तिच्या नाकावर ठोसा लगावला." 


या घटनेनंतरच हितेशाने सोशल मीडियावर झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय कामराजने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करणारा व्हिडिओ अपलोड केला होता. यानंतर पोलिसांनी कामराजला अटक केली होती, पण नंतर त्याला जामिनावर सोडून दिले. मात्र, या प्रकरणाचा खरा खुलासा झाल्यांनतर नेटिझन्सनी कामराजला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला होता.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area