एका जेवणाच्या थाळीवर दोन थाळी मोफत मिळणार म्हणून ऑर्डर केली अन्...

 करोनामुळे विलगीकरणात असलेल्या व्यावसायिकाला ऑनलाइन जेवण मागविणे चांगलेच महागात पडले. एका थाळीवर दोन थाळी मोफत मिळणार असल्याची जाहिरात पाहून विलगीकरणात असलेल्या दाम्पत्याने ऑर्डर दिली.मुंबई :
करोनामुळे विलगीकरणात असलेल्या व्यावसायिकाला ऑनलाइन जेवण मागविणे चांगलेच महागात पडले. एका थाळीवर दोन थाळी मोफत मिळणार असल्याची जाहिरात पाहून विलगीकरणात असलेल्या दाम्पत्याने ऑर्डर दिली. मात्र जेवणाऐवजी व्यावसायिकाच्या बँक खात्यातून २१ हजार परस्पर वळवण्यात आले.

जलवाहतुकीचा व्यवसाय असलेले ७० वर्षीय रमेशकुमार (बदललेले नाव) नरिमन पॉईंट येथील एनसीपीए अपार्टमेंटमध्ये वास्त्यव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी रमेशकुमार आणि त्यांच्या पत्नीचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. फार गंभीर संसर्ग नसल्याने पत्नी आणि रमेशकुमार दोघे घरामध्येच विलगीकरणात होते. दररोज जेवण करून कंटाळलेल्या त्यांच्या पत्नीने घरपोच जेवण मागविण्यास सांगितले. जेवण कुठून मागवायचे, याचा विचार करत असताना रमेशकुमार यांनी त्यांच्या फेसबुकवर पेजवर एक जाहिरात पाहिली. भगत ताराचंद हाटेल, झव्हेरी बाजार या नावाने असलेल्या जाहिरातीमध्ये एक थाळी घेतल्यास दोन थाळी मोफत मिळतील, असे नमूद केले होते. यामध्ये एक मोबाइल क्रमांक दिलेला होता.

रमेशकुमार यांनी जाहिरातीमधील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मोबाइलवर बोलणाऱ्या राहुल नावाच्या तरुणाने त्यांना ऑर्डर कन्फर्म करण्यासाठी एक लिंक पाठवली. रमेशकुमार यांनी लिंकवर क्लिक केल्यानंतर राहुल याने त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डचा नंबर, सीव्हीव्ही नंबर घेतले. यानंतर मोबाइलवर आलेले ओटीपी देखील रमेशकुमार यांना देण्यास भाग पाडले. रमेशकुमार यांनी ओटीपी देताच आधी १० हजार रुपये वजा झाले. रमेशकुमार यांनी याबाबत विचारताच सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम असल्याचे सांगत राहुल याने आणखी १० हजार आणि ९९९ रुपये त्यांच्या खात्यातून परस्पर वळविले. याबाबत विचारणा करताच राहुल याने फोन बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रमेशकुमार यांनी आपल्या कर्मचाऱ्याला याबाबत माहिती दिली. त्यांना विलगीकरणातून बाहेर पडता येत नसल्याने या अधिकाऱ्याने लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार केली.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area