शहापूूरचे ग्रामदैवत म्हसोबा देवाची यात्रा सलग दुसर्‍यावर्षी रद्द; मोजक्या संखेत पारंपारिक विधी संपन्न

 


इचलकरंजी : कोरोना महामारीचे संकट रोखण्यासाठी गर्दी टाळणे हा एकमेव पर्याय असल्याने शहापूूरचे ग्रामदैवत म्हसोबा देवाची यात्रा सलग दुसर्‍यावर्षी रद्द करण्यात आली. परंतु, मंगळवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी व नैवैद्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागल्याने तात्काळ त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करत मंदिराकडे येणारे सर्वच रस्ते रोखून धरण्यात आले. गुढी पाडव्यानंतर येणार्‍या पहिल्या मंगळवारी शहापूरातील ग्रामदैवत श्री म्हसोबा देवाची यात्रा भरते. 

संपूर्ण पंचक्रोशीतून श्री म्हसोबाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक येतात. यंदा ही यात्रा 20 एप्रिल रोजी भरणार होती. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे प्रशासन व यात्रा कमिटीने मागील वर्षाप्रमाणे यंदाची यात्रासुध्दा न भरविण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर नागरिकांना घरातच यात्रा साजरी करण्याचे त्याचबरोबर मंदिरात दर्शनासाठी जावू नये असे आवाहन केले होते. 

केवळ धार्मिक विधी पार पाडण्यात येणार असल्याने यात्रेच्या मध्यरात्री मंदिरातील पुजारी व मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत म्हसोबा मंदिरात पाणी घालून पारंपारिक विधी करण्यात आले. मंगळवार यात्रेचा मुख्य दिवस असल्याने पहाटेपासून दर्शन व नैवेद्यासाठी मंदिराकडे नागरिक जात असल्याचे आढळून आले. 

संचारबंदी, जमावबंदीचा आदेश असताना मंदिर व परिसरात गर्दी होऊ लागल्याची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी धाव घेऊन म्हसोबा मंदिराकडे येणार्‍या शहापूर रोड, कोरोची-यड्राव रस्ता, यड्राव फाटा आदी मार्गावर नाकाबंदी केली. मंदिराकडे येणार्‍या नागरिकांना प्रवेश नाकारत परत पाठविले. यावेळी सांगूनही न ऐकणार्‍या काही वाहनांवर कारवाई करत ती ताब्यात घेण्यात आली. पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने नागरिक मंदिराकडे येणे बंद झाल्याने दुपारनंतर परिसरात शुकशुकाट पसरला होता.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area