अल्पवयीन मुलीशी त्याने ऑटोतच प्रेमविवाह केला आणि...

 ऑटोरिक्षात साताजन्माची वचने देवून एका तरुणाने अल्पवयीन मुलीच्या गळ्यात हार घालत प्रेमविवाह केल्याची घटना उघड झाली आहे.​ लग्नातील वधूचे वय १७ वर्षे असल्याने या 'प्रेमविवाहा'नंतर मुलगा व मुलगी आपापल्या आई-वडिलांकडे राहत होते. मात्र या उत्साही युवकाने या प्रेमविवाहाचा व्हिडिओ व्हायरल केल्याने मुलीच्या घरी हा प्रकार कळला.
अमरावती: शहरातील छत्री तलावजवळील मंदिरासमोर दोन महिन्यांपूर्वी ऑटोरिक्षा उभा करून चक्क ऑटोतच साताजन्माची वचने देवून एका तरुणाने अल्पवयीन मुलीच्या गळ्यात हार घालत प्रेमविवाह केल्याची घटना उघड झाली आहे. लग्नातील वधूचे वय १७ वर्षे असल्याने या 'प्रेमविवाहा'नंतर मुलगा व मुलगी आपापल्या आई-वडिलांकडे राहत होते. मात्र या उत्साही युवकाने या प्रेमविवाहाचा व्हिडिओ व्हायरल केल्याने मुलीच्या घरी हा प्रकार समजला. अल्पवयीन मुलीने फ्रेजरपुरा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी नवरदेव आणि त्या ऑटोचालकासह पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. (a young man married an underage girl in an autorickshaw in amravati)


फ्रेजरपुरा पोलिस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलगी व एका मुलाचे प्रेमप्रकरण मागील काही दिवसांपासून सुरू होते. दरम्यान या दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. मात्र मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे. ३० जानेवारी २०२१ ला मुलाने कॉलेजला आलेल्या मुलीला त्याच्या दुचाकीवर बसवून छत्री तलाव मार्गावरील महादेव मंदिरासमोर आणले. यावेळी मुलाचे दोन मित्र एक प्रवासी ऑटो घेऊन तयार होते.


मुलगा आणि मुलगी त्या ठिकाणी पोहोचताच त्यांनी प्रवासी ऑटोत बसून एकमेकांच्या गळ्यात हार घातले. तसेच मुलाने मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. भांगेत कुंकूसुद्धा भरले. हा संपूर्ण बालविवाह ऑटोतच पार पडला. यावेळी या ऑटोतील विवाह सोहळ्याचा व्हिडिओसुद्धा काढला गेला. लग्न केले ही बाब मुलीच्या घरी माहीत नव्हती. त्यामुळे मुलगा त्याच्या तर मुलगी तिच्या घरीच राहत होते.


दरम्यान आता लग्न करणाऱ्या मुलानेच या ऑटोतील प्रेमबालविवाहाचा व्हिडिओ समाज माध्यमांवरील एका ग्रुपवर व्हायरल केला. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांना या बालविवाहाची माहिती मिळाली. या प्रकारामुळे अल्पवयीन मुलीने ५ एप्रिलला रात्री फ्रेजरपुरा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून ज्याच्यासोबत मुलीने लग्न केले, त्या युवकासह ऑटोचालक तसेच मुलाचे तीन मित्र जे लग्नाच्या वेळी उपस्थित होते, अशा पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area