Amravati: 'ते' कुटुंबासह बाहेरगावी गेले होते, परतल्यानंतर घरातील दृश्य बघून हादरलेच!

 अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खांडेश्वर येथे एकाच रात्रीच चार घरे फोडली. या घटनांमुळे खळबळ उडाली असून, नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. घरफोड्या आणि चोरीच्या घटना रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील छोरीया लेआउट परिसरात एकाच रात्री चार ठिकाणी 
चोरी आणि घरफोड्या झाल्या. चोरट्यांनी लाखो रुपये किंमतीचे दागिने आणि रोकड लांबवली. या चोरीच्या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव खंडेश्वर शहरातील छोरिया लेआउट येथील रहिवासी सचिन चौधरी हे काही कामानिमित्त आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. ११ एप्रिलच्या मध्यरात्री चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले. घरातील दागिने व रोख रक्कम असा अंदाजे २५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. तसेच राम केशव गुल्हाणे यांच्या घरचे कुलूप तोडून दोन चांदीच्या वाट्या व रोख रक्कम ३ हजार रुपये चोरले. त्यानंतर त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या केशव विठ्ठल पाठक यांच्या घराचे कुलूपही तोडले. घरातील कपडे अस्ताव्यस्त केले. त्यांच्या हाती काहीच लागले नाही.चोरट्यांनी आपला मोर्चा त्याच कॉलनीत राहणाऱ्या कौस्तुभ विनोद पूरसे (वय २२) याच्या घराकडे वळवला. त्याच्या घराच्या छताच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. अलमारीचे कुलूपही फोडले. त्यातील ७९ हजार ५०० किंमतीचे दागिने आणि ५ हजार रोकड चोरून नेली. त्याच क्षणी पुरसे कुटुंबातील सदस्यांना जाग आली असता, चार-पाच चोरटे पळून जात असताना दिसले. या चार घटनांमध्ये चोरट्यांनी अंदाजे एक लाख ११ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबवला. घटनेची माहिती मिळताच, पोलीस श्वानपथकासह तेथे पोहोचले. अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला. या प्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area