Hasan Mushrif: 'परमबीर यांना आरोपी केले असावे आणि...'; राष्ट्रवादीचा केंद्रावर गंभीर आरोप

 Hasan Mushrif: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवलेल्या स्फोटकांप्रकरणी सचिन वाझे व अन्य काही जणांना अटक करण्यात आली असली तरी या सर्वामागील मुख्य सूत्रधार कोण आहे, हे अद्याप उघड झालेले नाही.
कोल्हापूर: अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरन मृत्यू प्रकरणी तपास करत असलेल्या 
एनआयए टीमचे प्रमुख असलेले महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आल्याने या बदलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यावरून थेट केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. यात काहीतरी शिजत आहे आणि त्याची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी केली आहे. ( Hasan Mushrif On Anil Shukla Transfer )


एनआयएचे महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची बदली मिझोराम येथे करण्यात आली असून त्यांच्या जागी ज्ञानेंद्र वर्मा या अधिकाऱ्याकडे सूत्रे सोपवण्यात आली आहेत. आता वर्मा हे अँटिलिया स्फोटकं प्रकरण तसेच मनसुख हिरन मृत्यू प्रकरणी तपास करत असलेल्या पथकाचे नेतृत्व करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर बोट ठेवत हसन मुश्रीफ यांनी काही गंभीर विधाने केली आहेत. अनिल शुक्ला यांच्या बदलीचे वृत्त कळताच मुश्रीफ यांनी लगेचच आपली प्रतिक्रिया दिली आहे.'अनिल शुक्ला यांच्या तडकाफडकी बदलीचे कारण काय?, याची चौकशी होणे गरजेचे आहे', असे मुश्रीफ म्हणाले. संपूर्ण घटनाक्रमावरही त्यांनी प्रकाश टाकला. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके कुणी ठेवली?, तो कट कुणी रचला होता, हे यात सर्वात महत्त्वाचे होते. असे असताना मूळ प्रकरणाला फाटे फोडले गेले. परमबीर सिंग यांनी जेव्हा पत्र लिहिले होते तेव्हाच ते या कटात सहभागी असल्याचे मी म्हणालो होतो आणि आता तो तपास त्याच दिशेने जात असताना तपास अधिकाऱ्याची बदली झाली आहे. या प्रकरणात परमबीर सिंग यांची चौकशी झाली होती. त्यांना शुक्ला यांनी मुख्य आरोपी केले असावे आणि ते केंद्राला मान्य नसावे व त्यातूनच शुक्ला यांची बदली करण्यात आली असावी, असा संशयच मुश्रीफ यांनी घेतला.


या प्रकरणात सचिन वाझे यांना आता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यानंतर एनआयए पुढची पावले टाकत असतानाच ही बदली झाली. अशा प्रकरणात मध्येच तपास अधिकाऱ्याची बदली केली जात नाही. म्हणूनच ही बदली का केली गेली हे कळले पाहिजे, असेही मुश्रीफ पुढे म्हणाले. परमबीर सिंग हे माफीचे साक्षीदार होवू पाहत आहेत आणि तसे करण्यास शुक्ला यांनी नकार दिला असावा, असेही यातून स्पष्ट होते, असे मुश्रीफ म्हणाले.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area