नवाब मलिक यांच्याविरोधात भाजप आमदाराची पोलिस ठाण्यात तक्रार

 राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात भाजप मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी सोमवारी दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.


मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात भाजप मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी सोमवारी दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मलिक यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वाटपासंबंधी केंद्र सरकारविरोधात अफवा पसरवली व खोटी माहिती देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांनी महाराष्ट्राला या इंजेक्शनचा पुरवठा करू नये, अन्यथा परवाना रद्द केला जाईल, अशी धमकी केंद्र सरकारने या कंपन्यांना दिली असल्याची खोटी माहिती मलिक यांनी देत मलिक यांनी केंद्र व राज्य सरकारमध्ये नाहक वाद निर्माण केला. राष्ट्रीय ऐक्याला तडा जाईल असे वक्तव्य केले. इतकेच नव्हे तर प्रसारमाध्यमे व सोशल मीडियातून अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण केली, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

...तर न्यायालयात जाणार

मलिक यांचे हे कृत्य पूर्णपणे बेकायदा असून महामारी रोग कायद्यानुसार हा गुन्हा असल्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणीही भातखळकर यांनी तक्रारीत केली. राज्य सरकारने पुढील ४८ तासांत मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल न केल्यास या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा भातखळकर यांनी दिला.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area