CBSE Exam : दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

 CBSE बोर्डाच्या १०वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून १२वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्रात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचं जाहीर केलं होतं. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारनं देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षी CBSE च्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. त्यासोबतच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं देखील केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे. त्यामुळे वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि ११वीच्या प्रवेशांचं काय? अशी चर्चा सुरू झाली असून त्यांच्या गुणपत्रिका ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरियानुसार तयार करण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

१ जून रोजी  CBSE घेणार परिस्थितीचा आढावा!

केंद्रीय शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर CBSE परीक्षांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीच्या रद्द करण्यात आलेल्या परीक्षांनंतर त्यांच्या गुणपत्रिकांसाठी सीबीएसई बोर्डाकडून विशिष्ट प्रणाली तयार केली जाणार आहे. मात्र, यामध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश असेल? वर्षभरात झालेल्या परीक्षांचे गुण आधारभूत मानले जाणार आहेत का? याविषयी सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून आता १ जून रोजी CBSE कडून करोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षांचं काय?

महाराष्ट्र सरकारने याआधीच महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातल्या करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन यासंदर्भातला निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ११ एप्रिल रोजी होणाऱ्या MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातून दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. या आधारावर प्रशासकीय अधिकारी, पालक वर्ग आणि शिक्षण तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area