वाझेंच्या पत्रातील आरोप गंभीर, ‘दूध का दूध, पानी का पानी’ व्हावं, फडणवीसांकडून CBI चौकशीची मागणी

 सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात दोन कोटी आणि 50 कोटीचा उल्लेख आहे. हा मजकूर विचार करायला लावणारा आहे, असं फडणवीस म्हणाले (Devendra Fadnavis Anil Parab)
नागपूर : “निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी लिहिलेल्या पत्रातील मजकूर विचार करायला लावणारा आहे. पत्राची चौकशी होऊन ‘दूध का दूध पानी का पानी’ व्हावं” अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. ज्या राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट नाही, तिथून रेमडेसिव्हीर घेता येईल का, ते पाहाण्याची सूचनाही फडणवीसांनी सरकारला केली. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. वाझेंनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. (Devendra Fadnavis on Sachin Vaze allegations on Shivsena Minister Anil Parab)


“वाझेंच्या आरोपांचीही सीबीआय चौकशी करावी”

“सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात दोन कोटी आणि 50 कोटीचा उल्लेख आहे. हा मजकूर विचार करायला लावणारा आहे. महाराष्ट्रात घडतंय ते राज्याच्या आणि पोलिसांच्याही प्रतिमेसाठी चांगलं नाहीत. हायकोर्टाने सीबीआयला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. वाझेंच्या आरोपांचीही सीबीआय किंवा तत्सम तपास यंत्रणांकडून चौकशी करावी. “दूध का दूध पानी का पानी” व्हावं, सत्य बाहेर यावं, अन्यथा पोलिसांची डागाळलेली प्रतिमा कधीच सुधारणार नाही” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.


“जिथे लाट नाही, तिथून रेमडेसिव्हीर घ्या”

“रेमडेसिव्हीरबाबत विशेष लक्ष राज्य सरकारने द्यावं. गेल्या वेळीही त्याचा काळा बाजार झाला होता. मात्र कोरोनाची दुसरी लाट काही राज्यांमध्येच आहे. त्यामुळे जिथे लाट नाही, तिथून रेमडेसिव्हीर घेता येईल का, ते पाहावं. कंपन्यांशी संपर्क साधून पुरवठा करण्याबाबत निश्चित करावं. काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी” अशी मागणी फडणवीसांनी केली.


“फसवल्याची भावना व्यापाऱ्यांमध्ये”

“लॉकडाऊनबाबत निर्णय घेताना राज्य सरकारने सर्व स्टेकहोल्डरशी बोलायला हवं होतं. जेणेकरुन त्यांनाही दिलासा मिळाला असता, आणि कोरोना केसेस कमी करण्यासाठीही मार्ग निघाला असता. दोन दिवसांचा लॉकडाऊन सांगताना सात दिवस कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे फसवल्याची भावना व्यापाऱ्यांमध्ये आहे. जीवन महत्त्वाचं आहेच, पण खिशात पैसे नसतील तर कसं जगायचं, हा प्रश्न अनेक जणांना पडल्याचं फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis Anil Parab)


“लसीचं राजकारण आणि जीवाशी खेळ बंद करा”

“समाजातील घटकांचा उद्रेक झाला आहे. त्याबाबत सरकारने भाष्य करावं. समाज आणि सरकार हे समोरासमोर यायला नको. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कालच पत्र पाठवलं. महाराष्ट्राला किती लसी पाठवल्या आणि किती शिल्लक आहेत, याची आकडेवारी दिली. महाराष्ट्राच्या


दुप्पट लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त लसी महाराष्ट्रात पाठवल्या आहेत. कोरोना लसीचं राजकारण आणि जीवाशी खेळ बंद करा” असा इशाराही फडणवीसांनी दिला.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area