दादर येथील चैत्यभूमीलगत असलेल्या धर्मशाळेच्या इमारतीवर दुरुस्तीच्या नावाने अनधिकृतपणे बांधण्यात आलेला एक मजला अखेर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे महापालिका व पोलिसांनी संयुक्त कारवाई करून उद्ध्वस्त केल्याची माहिती मुंबई रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी दिली.
राजकीय आशीर्वादाने उभारण्यात आलेल्या ३० फूट उंचीच्या अनधिकृत बांधकामामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेले स्तूप झाकले जात होते. मुंबई महापालिका व शिवाजी पार्क पोलिसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वीच ही कारवाई केल्यामुळे सामाजिक सलोखा राखण्यास मदत झाली आहे, अशी प्रतिक्रिया सोनावणे यांनी व्यक्त केली.
दादर येथील चैत्यभूमी लगतच्या सांची प्रवेशद्वाराजवळ धर्मशाळा आहे. त्याची दुरुस्ती करण्याच्या नावाखाली मुंबई महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत मजला उभारण्यात आला. त्यामुळे चैत्यभूमी झाकली जात होती. या संदर्भात महापालिकेकडे तक्रार करण्यात आल्यानंतर व कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर शनिवारी महापालिकेचे अधिकारी व पोलिसांनी संयुक्त कारवाई करून हे बेकायदा बांधकाम तोडल्याचे त्यांनी सांगितले.
भीमराव आंबेडकर यांची तक्रार
करोना टाळेबंदीचा फायदा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी झाकण्यासाठी लगतच्या धर्मशाळेच्या दुरुस्तीच्या नावाखाली अनधिकृत मजला बांधण्याचे कारस्थान रचण्यात आल्याची तक्रार भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी व महापालिकेकडे केली होती. त्याची दखल घेऊन हे बेकायदा बांधकाम तोडण्यात आल्याचा दावा जगदीश गवई व एस. के. भंडारे यांनी केला आहे.