राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात सभा घेतली आणि संपूर्ण देशात या सभेची चर्चा झाली. (In Pandharpur, Devendra Fadnavis addresses rally in rain)
पंढरपूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात सभा घेतली आणि संपूर्ण देशात या सभेची चर्चा झाली. त्यानंतर परवाच्या दिवशी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पंढरपुरात भर पावसात सभा घेतल्याने पुन्हा चर्चेला उधाण आलं. काल पंढरपुरातही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत पावसाने हजेरी लावली. मात्र, पाऊस जोरदार पडला नाही. थेंब थेंब पाऊस पडला. त्यामुळे भाजपलाही पंढरपुरात फडणवीसांच्या सभेत जोरदार पावसाच्या चमत्काराची आस लागली आहे. (In Pandharpur, Devendra Fadnavis addresses rally in rain)
काल सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान औताडे यांच्यासाठी सहा सभा घेतल्या. कासेगाव, गाढेगाव आणि पंढरपुरात या सभा झाल्या. प्रत्येक सभेत ते विरोधकांवर बरसले. मात्र, पंढरपुरात सभा सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला. थेंब थेंब पावसाने हजेरी लावले. मात्र, वारं प्रचंड सुटलं होतं. वादळामुळे ढग पुढे सरकल्याने जोरदार पाऊस पडला नाही. मात्र, पावसाची रिमझिम सुरू असतानाही फडणवीस बोलत होते आणि पंढरपूरकरही सभेच्या ठिकाणी बसून होते. कुणीही चुळबुळ केली नाही. सर्वजण भाषण ऐकण्यात तल्लीन झाले होते. मात्र, पाऊस जोरदार न झाल्याने भाजप नेत्यांचा चांगला हिरमोड झाला. रिमझिम पाऊस पडल्याने भाजपला पाऊस कॅश करता आला नाही. त्यामुळे पवारांसारखेच फडणवीसही भर पावसात सभा करणारे योद्धे आहेत, असं ठसवण्याचे भाजपचे मनसुभेही उधळले गेले. स्वत: खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनीही फडणवीस यांची सभा पावसात व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, फडणवीसांच्या सभेत म्हणावा तसा पाऊस न पडल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
भाजप नेत्यांची शेरोशायरी
सभेत रिमझिम पाऊस पडल्याने देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटरवरून या सभेचे फोटो शेअर केले. भाजप नेत्यांनीही एका शेरसहित हा फोटो शेअर केला. पंढरपूर-मंगळवेढ्यातील उमेदवार समधान आवताडे यांनी फडणवीसांचा हा फोटो शेअर करत अपने संघर्षों की तारीख़ें आबाद रखेंगे, लड़ाई ऐसे लड़ेंगे की विरोधी भी याद रखेंग़े ! हा शेर शेअर केला. माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते यांनीही हाच फोटो आणि शेर शेअर केला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी फडणवीसांचा रिमझिम पावासातील हा फोटो शेअर केला आहे. फडणवीसांच्या सभेतही जोरदार पाऊस पडण्याचा चमत्कार होईल, असं भाजप नेत्यांना वाटत आहे. (In Pandharpur, Devendra Fadnavis addresses rally in rain)