महिलेवर ११ जणांनी केला सामूहिक बलात्कार; ८ आरोपींना करोनाचा संसर्ग

 झारखंडमधील पाकुड येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी सर्व ११ आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील आठ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

झारखंड: झारखंडमधील पाकुड येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ३५ वर्षीय महिलेवर ११ जणांनी सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर पीडित महिला दोन दिवस बेशुद्धावस्थेत होती. शुद्धीवर आल्यानंतर महिलेने आपल्या कुटुंबीयांसह मुफस्सिल पोलीस ठाणे गाठून आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस पथकाने ११ आरोपींना अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी सर्व आरोपींची करोना चाचणी केली. त्यातील आठ जणांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पीडित महिलेलाही करोनाचा संसर्ग झाला आहे.

झारखंडमधील पाकुड येथे ही घटना घडली. पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेचा उलगडा केला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये पीडित महिलेचे नातेवाइकही आहेत. महिला संध्याकाळच्या वेळी शौचासाठी जात होती. रस्त्यात काही लोक मद्यपान करत होते. महिलेला एकटीला पाहून आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवून तिचे अपहरण केले. काही अंतरावर झुडुपात नेऊन महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी आपल्या काही नातेवाइकांनाही बोलावून घेतले. त्यांनी रात्रभर तिच्यावर अत्याचार केले. सर्व आरोपी दुसऱ्या दिवशी सकाळी तिला बेशुद्धावस्थेत तिथेच सोडून पसार झाले. महिला शुद्धीवर आल्यानंतर कशीबशी घरी पोहोचली. तिला मोठा मानसिक धक्का बसला होता.

महिला दोन दिवसांनी कुटुंबीयांसोबत मुफस्सिल पोलीस ठाण्यात पोहोचली. तिथे घडलेली हकिकत सांगितली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या माहितीनुसार, महिला संध्याकाळच्या वेळेस याच रस्त्याने जात असल्याचे आरोपींना माहीत होते. सर्व आरोपी रस्त्यालगत दबा धरून बसले होते. त्यांच्याकडे शस्त्रे सुद्धा होती. ते दारू प्यायले होते. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करताना १० आरोपींना अटक केली होती. एक अल्पवयीन मुलगा फरार होता. मात्र, त्याला नंतर अटक करण्यात आली.


पोलिसांनी सर्व ११ आरोपींना अटक केली होती. त्यांची करोना चाचणी करण्यात आली असता, त्यातील आठ जणांना करोना झाला असल्याचे स्पष्ट झाले. पीडितेची करोना चाचणी केली असता, ती सुद्धा करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. सर्व करोनाबाधित आरोपींवर कडेकोट सुरक्षेसह लिट्टीपाडा कोविड रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area