कोल्हापूर आयपीएल सामन्यावर बेटिंग करणाऱ्या तिघांना अटक


कोल्हापूर:  राजारामपुरीतील परमिट बारमध्ये सुरू असलेल्या आयपीएल बेटिंगअड्ड्यावर राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली. रोख रक्कम, मोबाईलसह 1 लाख 2 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यावर बेटिंग सुरू होते. याप्रकरणी बुकीमालक, बार मॅनेजरसह एकूण सहाजणांविरोधात गुन्हा दाखल झाला. 

 

आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग जुगार सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांना मिळाली होती. राजारामपुरी शाहूनगरातील विकास परमिट बारमध्ये हा प्रकार सुरू होता. या ठिकाणी सुजित कांतिलाल ओसवाल (वय 43, रा. प्रतिभानगर), दिनेश लीलाबचंद ओसवाल (45, भगतसिंग कॉलनी, प्रतिभानगर) व अजित रतनलाल ओसवाल (49, रा. गंगावेस) हे तिघे क्रिकेट बेटिंग खेळत होते. पोलिस कॉन्स्टेबल सचिन देसाई, महेश पोवार, प्रवीण आवडे, सुरेश काळे, सत्यजित सावंत यांच्या पथकाने छापा (crime news) टाकून या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ रोख रक्कम व महागडे मोबाईल मिळून आले.

जेवण, दारूची जागेवर सोय

परमिट बारमध्ये बसण्याला मनाई असतानाही या ठिकाणी संशयितांसाठी दारू, जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. एलसीडी टी.व्ही.वर क्रिकेट सामना पाहून संबंधित संघांवर बोली लावून बेटिंग घेतले जात होते. बार मॅनेजर संदीप नलवडे याने संशयितांना दारू, जेवणाची व्यवस्था केल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Ads Area